नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा सुटला आहे. पण पक्ष बळकटीच्या मुद्द्यावर लिहिण्यात आलेल्या पत्राचा वाद मात्र मिटल्याचं दिसत नाहीए. काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अहमद पटेल यांनी आनंद शर्मांवर निशाणा साधला होता. यांनीच सोनियांना पत्र लिहिल्याचा आरोप पटेल यांनी केला होता. आता या प्रकरणी आनंद शर्मा यांनी उत्तर दिलं आहे.

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. सत्ताधारी भाजपचा सामना करण्यासाठी देशाला बळकट विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. प्रामाणिकपणे सूचना देणं म्हणजे पक्षाशी मतभेद नव्हेत. किमान सर्व सहकाऱ्यांनी ते पत्र वाचलं असतं तर बरं झालं असतं. हे पत्र पक्षाच्या सर्वोत्तम हितासाठी लिहिलं गेलं होतं. आणि त्यात देशातील सद्यस्थिती बाबत चिंता व्यक्त केली गेली होती, असं आनंद शर्मा म्हणाले.

सोनिया गांधी यांना पत्र लिहिलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत अंबिका सोनी यांनी केली होती. पक्षाची शिस्त मोडणाऱ्यांवर कॉंग्रेसच्या घटनेनुसार कारवाईचा निर्णय घेतला पाहिजे, असं अंबिका सोनी म्हणाल्या.

काँग्रेसची सीडब्ल्यूसीची सोमवारी झालेली बैठक ही सुमारे २ आठवड्यांपूर्वी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्राच्या मुद्द्यावरून बोलवण्यात आली होती. सीडब्ल्यूसीचे सदस्य, यूपीए सरकारमधील मंत्री असलेले नेते आणि खासदार अशा किमान २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्ष संघटनेच्या विषयावर सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here