मुंबई : मुंबईसह राज्यभरात मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, कावीळ, एचवनएनवन यासारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. १ ते १६ जुलै या कालावधीत मुंबईत गॅस्ट्रोची सर्वाधिक म्हणजे ९३२ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली असून मलेरिया झालेल्या रुग्णांची संख्या ३५५ इतकी आहे. या कालावधीत मुंबईत स्वाइन फ्लूच्या ५२ रुग्णांची नोंद झाल्याचे पालिकेसह राज्याने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

पावसाळा सुरू झाल्यावर मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळ, चिकुनगुनिया, एचवनएनवन या रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ झाली आहे. जून महिन्यात मलेरियाच्या ६७६, तर गॅस्ट्रोच्या १७४४ रुग्णांची नोंद झाली. कावीळचे १४१, तर एचवनएनवनचे ९० रुग्ण मुंबईमध्ये आढळून आले. मागील वर्षातील जुलै महिन्याशी तुलना करता यावर्षी अवघ्या १५ दिवसांत रुग्णसंख्या अधिक असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. जुलै २०२२मध्ये मलेरियाच्या ५६३, तर गॅस्ट्रोच्या ६७९ रुग्णसंख्येची नोंद मुंबईत झाली होती. यावर्षी अवघ्या सोळा दिवसांत मलेरियाचे ३५५, तर गॅस्ट्रोचे ९३२ रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत.

Weather Forecast : आनंदाची बातमी: राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय; पुढील आठवडाभर या भागाला पाऊस झोडपून काढणार!
दोन वर्षांची तुलना

(जुलै १ ते १६) २०२३ २०२२

मलेरिया ३५५ ५६३

लेप्टो १०४ ६५

डेंग्यू २६४ ६१

गॅस्ट्रो ९३२ ६७९

कावीळ ७६ ६५

चिकुनगुनिया १० २

एचवनएनवन ५२ १०५

स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ

राज्यामध्ये या महिन्यातील पहिल्या १७ दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या ११५ रुग्णसंख्येची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. १ ते १७ जुलै या कालावधीत एचवनएनवनची १८, तर एथ्रीएनटूची ७७ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. एचवनएनवनमुळे तीन जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

डेंग्यूचाचणी दरनिश्चिती

पावसाळ्यात होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता डेंग्यूच्या निदानचाचणीसाठी निश्चित शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत होती. आता इलायझा चाचणीसाठी सहाशे रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. २९ जुलै २०२१ रोजी आरोग्यसेवा आयुक्त वा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय प्रयोगशाळा नियंत्रण व नियामक तत्त्वे तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने दर नियंत्रण व नियमित करण्यासाठी १६ जून रोजी अहवाल सादर केला आहे. या समितीच्या अहवालामध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा स्थापन करण्यास तसेच व्यवस्थापन, नियंत्रण व मार्गदर्शक तत्त्वांबाबत माहिती दिली आहे. एमसीआय नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट अहवाल तयार करू शकतात.

प्रत्येक वैद्यकीय शाखेची नोंदणी व नियमात तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट लागू करावा. प्रयोगशाळा नोंदणी तीन वर्षांसाठी असावी. त्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे कायद्यानुसार असावीत. नोंदणी करण्यास पालिका कार्यक्षेत्रात वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ग्रामीण भागातील जिल्हा आरोग्य अधिकारी व नागरी भागात जिल्हा शल्यचिकित्सक यांना संबंधित विषयाचे अधिकारी म्हणून अधिकार देण्यात आले आहेत. नोंदणी ऑनलाइन पारदर्शक पद्धतीने करावी. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट व शासनस्तरावर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीमार्फेत दर नियमाबाबत कार्यवाही सुरू आहे.

दरामध्ये समानता असावी

२८ सप्टेंबर २०१६ रोजीच्या सरकारी निर्णयानुसार डेंग्यू निश्चित निदान चाचणीसाठी सहाशे रुपये दरआकारणी करण्यात आली आहे. मात्र राज्यात सगळीकडे पॅथालॉजी लॅबमध्ये विविध दर आकारले जातात. त्यात एकसमानता यावी, अशी मागणी केली जात आहे.

Rain Forecast : या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, शनिवारपर्यंत IMD चा अतिवृष्टीचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here