राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाचा आज तिसरा दिवस आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने भाजपला कोंडित पकडून कालचा दिवस गाजवला. आज अधिवेशन कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेसने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. कित्येक महिन्यांतून पहिल्यांदाच विधानसभेत काँग्रेस नेत्यांची एकजूट दिसून आली. विरोधकांची संख्या कमी असल्याची चर्चा होत असताना आक्रमक पवित्रा घेऊन काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्षनेत्याची कमी जाणवून दिली नाही. यावेळी धनंजय मुंडेंची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
वडेट्टीवारांनी धनुभाऊंना घेरलं, थोरातांनीही हल्ला चढवला
खतांच्या वाढेलल्या किमतीच्या अनुषंगाने आमदार विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. २०१४ पूर्वी आणि गेल्या ८ वर्षातील झालेली भाववाढ ही तिप्पट आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांचे दर वाढले की तुम्ही वाढवता, मग तिकडे दर कमी झाले तर शेतकऱ्यांना कमी दराने खतांची विक्री का होत नाही? असा रोकडा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी खतांचे भाव वाढलेले नाहीत, भाव स्थिर असल्याचं सांगितलं. धनंजय मुंडे यांच्या या उत्तरावर मात्र बाळासाहेब थोरातांचा चांगलाच पारा चढला. अनुदान कमी करुन खतांमध्ये केंद्र सरकारकडून नफेखोरी होतीये, हे सांगायला आपण का घाबरता? असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर हल्ला चढवला.
आपण धनंजय मुंडे यांचे वकील आहात काय? अशोक चव्हाण यांचा शेलारांवर तिरकस बाण
धनंजय मुंडे सरकारी बाजूने संयमीपणाने उत्तर देत असताना त्यांच्या उत्तरावर विरोधी पक्षाचं समाधान होत नव्हतं. काँग्रेस नेते अनेकदा हरकतीचे मुद्दे नोंदवत होते. यामुळे चिडलेल्या आशिष शेलार यांनीही हरकत घेतली. त्यावेळी आपण धनंजय मुंडे यांचे वकील आहात काय? अशी विचारणा करुन अशोक चव्हाण यांनीही ‘खडाखडी’त भाग घेतला.
बोगस बियाणांच्या संदर्भात कायदा आणणार : धनंजय मुंडे
बोगस बियाणांच्या संदर्भात १९६६ चा कायदा आहे. बीटी कॉटनचा कायदा आला. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक होते हे मी मान्य करतो, पण आता त्यासाठी आपण कायदा आणत असल्याचं, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
धनंजय मुंडेंच्या मदतीला अजित पवार धावले
धनंजय मुंडे यांच्या उत्तराने समाधान होत नसल्याचं सांगून अखेर चिडलेल्या विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या मदतीसाठी धावले. खतांच्या किंमती स्थिर रहाव्यात यासाठी केंद्र सरकारने यंदा १ लाख ३० हजार कोटींची सबसिडी दिलेली आहे, असं सांगून त्यांनी धनंजय मुंडे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.