कल्याण परिमंडलातील कल्याण एक आणि दोन, वसई, पालघर या चारही मंडल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. झाडांच्या मोठ्या फांद्या, झाडे वीज तारांवर पडून विजेचे खांब जमीनदोस्त होण्यासह वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याच्या घटना घडत आहेत. महावितरणचे कर्मचारी आणि कंत्राटदारांचे कामगार भर पावसात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. तथापि संततधार तसेच मध्येच बरसणाऱ्या मुसळधार पावसाने दुरुस्तीच्या कामात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत बाधित ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.
कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक आणि कार्यकारी अभियंते वीजपुरवठ्याची स्थिती, दुरुस्तीचे काम तसेच साधनसामग्रीची उपलब्धता याबाबत सातत्याने आढावा घेत आहेत. सर्व उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, जनमित्र तसेच कंत्राटदारांचे कामगार वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. पाणी साचल्याने सुरक्षेच्या कारणास्तव बुधवारी कल्याण मंडल एकमधील डोंबिवली विभागातील आयरेगाव, गणेशकृपा, विंडसर प्लाझा, विजयनगर, केळकर रोड, कोपररोड, कल्याण पूर्व विभागातील राजाराम पाटील नगर, अशोक नगर, लोकधारा, मलंगगड रोड हे रोहित्र बंद ठेवण्यात आले होते.
कल्याण मंडल दोनमधील उल्हासनगर एक विभागातील १४ रोहित्र तर उल्हासनगर दोन विभागातील पाले फिडरवरील जैनम एक आणि दोन, इंद्रविहार, पटेल, स्वानंद, भारतनगर, नावरेनगर रोहित्र बंद ठेवण्यात आले होते. वसई मंडल कार्यालयांतर्गत तुळींज शाखा कार्यक्षेत्रातील ९ रोहित्र आणि आचोळे शाखेतील ३ रोहित्र पाणी साचल्याने सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले होते. पाणी ओसरल्यानंतर संबंधित रोहित्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे. पालघर मंडलांतर्गत अलयाली, वारंगडे आणि कनोरिया या तीन ३३/११ उपकेंद्रांमध्ये पाणी साचले. परंतू या उपकेंद्रातून होणाऱ्या वीज पुरवठ्यावर परिणात झाला नाही. तर झाडपोली गावात रोहित्रावर झाड पडून खंडित झालेला वीजपुरवठा दुरुस्तीनंतर सुरळीत करण्यात आला.