म. टा. प्रतिनिधी,

आपली प्रेयसी रिक्षाचालकाबरोबर पळून गेल्यामुळे प्रेमभंग झालेल्या प्रियकराने चक्क रिक्षाचालकांनाच लक्ष्य करून त्यांचे महागडे फोन चोरल्याचे समोर आले आहे. लष्कर पोलिसांनी या प्रेमवीर चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून ८० पेक्षा जास्त मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

पुण्यासह मुंबईमधील अनेक रिक्षाचालकांचे मोबाइल या चोरट्याने लंपास केले आहेत. आसिफ उर्फ भुरा शेख (वय ३७, सध्या रा. पूना कॉलेज जवळ, मूळ रा. बिहार, उत्तर प्रदेश) असे या चोरट्याचे नाव आहे. आसिफची प्रेयसी अहमदाबाद, गुजरात येथील असून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. काही महिन्यांपूर्वी अचानक त्याच्या प्रेयसीचे एका रिक्षाचालकासोबत प्रेमसंबंध जुळले. याची खबर आसिफला लागायच्या आता तिने त्या रिक्षावाल्यासोबत पळ काढला. आपली प्रेयसी एका रिक्षाचालकासोबत पळून गेली हे ऐकून आसिफला धक्का बसला. त्याला रिक्षाचालकांची चीड आली. त्याच रागातून चिडून त्याने रिक्षाचालकांचे मोबाइल चोरण्यास सुरुवात केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कात्रज, कोंढवा; तसेच शहरातील विविध भागांतून रिक्षामधून प्रवास करताना आसिफ रिक्षाचालकांना हेरून त्यांच्याकडे महागडे मोबाइल आहेत का, हे पाहायचा. त्यानंतर इच्छितस्थळी उतरल्यानंतर आपला मोबाइल घरीच राहिला असल्याची बतावणी करून फोन करण्यासाठी संबंधित रिक्षाचालकाकडून मोबाइल घ्यायचा, रिक्षाचालक आपली गाडी लावत असल्याचा गैरफायदा घेऊन मोबाइल घेऊन तो पोबारा करत होता. मोबाइल चोरणाऱ्या आसिफची माहिती पोलिसांना एका बातमीदाराकडून मिळाली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. त्याने चोरीचे कारण सांगितल्यानंतर पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहेत. आसिफने केवळ रिक्षाचालकांचेच फोन चोरल्याचे पोलिसांना सांगितले. कोर्टाने त्याला २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

”प्रेमभंग झाल्याने त्याचा बदला म्हणून हा चोरटा रिक्षाचालकांना लक्ष्य करून त्यांचे महागडे फोन चोरत होता. त्याने ८० मोबाइल चोरले असून त्यापैकी १२ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.” – चंद्रकांत भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस स्टेशन

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here