जयश्री किशन वाघ ही १८ वर्षांची मुलगी याच गावची रहिवासी आहे. पण, सध्या ती पनवेल येथे आश्रमात राहून १२ वीचे शिक्षण घेत आहे. खालापूर दुर्घटनेत जयश्रीचं अख्खं कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. त्यांच्यापैकी एकाचीही अद्याप काहीही माहिती नाही. जयश्री ही पनवेलला राहत असल्याने ती या दुर्घटनेतून बचावली. पण, तिच्या कुटुंबातील कुणीही अद्याप सापडलं नसल्याने भीतीने तिच्या डोळ्यातील पाणी थांबायचं नाव घेत नाहीये.
जयश्रीचे आई, वडील, आजी, आजोबा, लहान भाऊ, आत्या आणि आत्याचा मुलगा असे एकूण ७ जण ढिघाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांच्यापैकी अजून एकही जण भेटलेलं नाही. ही दुर्घटना घडली तेव्हा जयश्री आश्रमात असल्याने तिचा जीव वाचला. मात्र, संपूर्ण कुटुंबाला गमवलायमुळे तिचावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ती कोणाशीही बोलायच्या मनस्थिती नाहीये. जयश्रीचे वडील मजुरी करतात. आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी तिला पनवेल येथील आश्रमात टाकले होते.
इर्शाळवाडी येथील दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनेकजणांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. या घटनेनंतर इर्शाळवाडी येथे तात्पुरता पोलीस कंट्रोल रुम स्थापन करण्यात आलं आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना येथून आवश्यक ती माहिती पुरवली जात आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.