म. टा. प्रनिधिनी,

निवृत्त पोलिस महासंचालक यांच्या उंड्री येथील फ्लॅट फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी याच इमारतीमधील आणखी एका व्यक्तीचा फ्लॅट फोडला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या सुरू असून, आता तर थेट निवृत्त पोलिस महासंचालकांचे घर फोडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत श्याम नागोराव खंते (वय ६७, रा. उंड्री, कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री परिसरात न्याती विंन्डचॅइम्स सोसायटीचे तक्रारदार चेअरमन आहेत. त्यांच्या सोसायटीतील १००१ क्रमांचा फ्लॅटमध्ये माजी पोलिस महासंचालक राज खिलनानी राहतात. त्यांची मुलगी हैदराबाद येथे राहते. मार्च महिन्याच्या अगोदर ते त्यांच्या मुलीकडे गेले होते. लॉकडाउन सुरू झाल्यामुळे त्यांना मुलीकडेच थांबावे लागले. अज्ञात चोरट्यांनी २३ ऑगस्टच्या रात्री त्यांच्या बंद फ्लॅट फोडून आत प्रवेश केला. त्यांच्या फ्लॅटमधून मौल्यवान ऐवज चोरून नेला आहे. मात्र, खिलनानी हे हैदराबादला अडकल्यामुळे कितीचा ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार खिलनानी यांना कळविल्यानंतर ते पुण्यात दाखल झाले.

खिलनानी राहत असलेल्या इमारतीमधील नैला रिझवी यांचादेखील फ्लॅट चोरट्यांनी फोडला आहे. ते कामाच्या निमित्ताने परदेशात असतात. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फ्लॅटमध्ये मौल्यवान ऐवज नसल्याचे सांगितले. तक्रारदार नेहमीप्रमाणे सकाळी इमारतीमध्ये फिरत असताना हा घरफोडीचा प्रकार समोर आला. त्यानंतर घटनेची माहिती कोंढवा पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. निवृत्त पोलिस महासंचालकांच्या घरात चोरी झाल्याचे आढळून आल्यानंतर पोलिस उपायुक्तांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांना माग काढला जात आहे. वरिष्ठ निवृत्त अधिकारी यांच्या घरात घरफोडी असल्यामुळे ऐवज अथवा इतर माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात येत होती.

सीसीटीव्हीत चोरटे कैद

सोसायटीत परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले आहेत. मात्र, त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. त्यांच्या माग काढण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेची पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

घरफोड्यांचे प्रकार वाढले

गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज दोन ते तीन घरफोड्या घडत असून, त्यामध्ये लाखोंचा ऐवज चोरीला जात आहे. या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश येताना दिसत नाही. अनलॉक सुरू झाल्यानंतर घरफोडीचे प्रकार वाढलेले दिसत आहेत. त्यामुळे शहरात गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here