‘एनआयए’ शोध घेत असलेल्या दोघा दहशतवाद्यांना पुणे पोलिसांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री अटक केली. महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कोथरूड पोलिस ठाण्यातील शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री गस्त घालत असताना, तिघे जण दुचाकी चोरण्याच्या तयारीत दिसले. संशयावरून खान आणि साकी यांना ताब्यात घेण्यात आले. त्या वेळी आलम फरारी झाला. साकी आणि खान ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबधित असून, ते जयपूर येथे घातपात घडवण्याच्या तयारीत होते, अशी माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.
दीड वर्षांपासून कोंढव्यात वास्तव्यास
स्फोटके बाळगल्याप्रकरणी ‘एनआयए’ने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर दीड वर्षांपासून ते कोंढव्यात वास्तव्यास होते. आलम याच्या इशाऱ्यावर साकी आणि खान काम करीत असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे आलम याचे नाव पहिल्यांदाच समोर आल्याने त्याला शोधण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
ग्राफिक्स डिझायनर म्हणून वावर
साकी आणि खान ग्राफिक्स डिझायनर म्हणून वावरत होते. या कामाच्या बहाण्याने ते विविध ठिकाणी वावरत होते, अशी माहिती मिळाली असून, हे तिघे पुण्यात कोणाच्या संपर्कात होते, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या वर्षी कोंढव्यात छापा टाकून बंदी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पीएफआय) दोघांना अटक केली होती; तसेच दापोडीतून जुनैद महंमद अता महंमद याला अटक केली होती. पुण्यात सतत संशयित दहशतवादी सापडत असल्याने आणि पूर्वी अतिरेकी हल्ले झाल्याने पुण्याला दहशतवाद्यांकडून धोका आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ड्रोनच्या साह्याने घातपात?
महंमद साकी आणि महंमद खान यांच्या कोंढव्यातील घरी ड्रोनचे साहित्य सापडल्याने हे दहशतवादी ड्रोनच्या साह्याने काही घातपात करणार होते का, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. या दहशतवाद्यांच्या रडारवर पुणे शहर होते का, या दृष्टीनेही यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दोघा दहशतवाद्यांची चौकशी करण्यात येत आहे. प्रकरण गंभीर असून, बारकाईने तपास करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.