मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. मुंबईत पेट्रोल प्रती लीटर ८८.३९ रुपये असून ८०.११ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८१.७३ रुपये आणि डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे.

जागतिक बाजारात मागील महिनाभर कच्च्या तेलाचा भाव स्थिर आहे. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने तेल आयातीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी मागील सहा दिवस पेट्रोल दरात वाढ केली होती. तर जवळपास तीन आठवडे डिझेलची किंमत स्थिर आहे.

मुंबईत आजचा पेट्रोलचा भाव ८८.३९ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लीटर ८०.११ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८१.७३ रुपये आणि डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.७३ रुपये असून डिझेल ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८३.२४ रुपये आहे. तर डिझेल ७७.०६ रुपये प्रती लीटर आहे.

दरम्यान, मंगळवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. लाॅरा या चक्रीवादळाच्या धोक्यामुळे मेक्सिकोतील बहुतांश तेल विहिरी बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या उत्पादनावर परिणाम झाला. मंगळवारी तेलाचा भाव ७३ सेंट्सने वधारून ४५.८६ डॉलर प्रती बॅरल झाला. मागील पाच महिन्यातील हा उचांकी दर आहे.

देशात भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे जवळपास ९० पेट्रोलपंप आहेत. देशातील इंधनाचे दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहे. त्यामुळे दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा दर निश्चित केला जातो. यापूर्वी पंधरवड्याने इंधन दर आढावा घेतला जात होता. पेट्रोल आणि डिझेलमध्ये स्थानिक कर लागू होत असल्याने देशात त्याचे दर वेगवेगळे आढळून येतात.

सरकारी तेल कंपन्यांनी चीन कंपन्यांद्वारे चालवल्या जाणार्‍या तेलवाहू टँकरसाठी करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी कंपन्यांचे टँकर कोणत्याही तिसर्‍या देशात नोंदणीकृत असतील तर त्यांना कंत्राट देण्यात येणार नाही. सीमेवरील चीनच्या कुरापतींमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. चीनबरोबरचा व्यापार मर्यादित करण्याचे प्रयत्न भारत सरकारकडून विविध स्तरावर सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी हे पाऊल उचललं आहे. तेल कंपन्या या मोहिमेमध्ये तेल व्यापारी आणि पुरवठादारांना सहभागी करण्याच्या योजनेवर काम करत आहेत. चिनी टँकरद्वारे तेलाची वाहतूक करू नये असं त्यांना तेल कंपन्यांकडून सांगितलं जाईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here