राज्य सरकारने २१ जुलै रोजी ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये राज्यातील अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले.
लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची नागपूर स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली असून त्यांच्या जागी नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी आता गोंदियाचे सहायक जिल्हाधिकारी अनमोल सागर यांची नियुक्ती झाली आहे.
लातूर जिल्ह्याची निर्मिती १९८२ साली झाली. जिल्ह्याच्या ४० वर्षाच्या प्रशासकीय कारभारात जिल्हाधिकारी म्हणून प्रथमच एका महिलेच्या हाती कारभार देण्यात आला आहे. कर्ता चांगला असेल तर प्रगतीचा मार्ग गतिमान होतो, तसच काही जिल्ह्याची प्रशासकीय जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे. आता महीला म्हणून त्या जिल्हयाचा कारभार कसा हकणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारनं ४१ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यात नवे कारभारी कामकाज पाहतील. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची देखील दीड महिना पूर्ण होत असताना बदली करण्यात आली. तुकाराम मुंढे यांची आतापर्यंत २१ वी बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे कृषी आणि पशूसंवर्धन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढे हे यापूर्वी देखील या विभागात कार्यरत होते. त्यांची मराठी भाषा विभागात जूनच्या पहिल्या आठवड्यात बदली करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांच्यावर कृषी विभागात जबाबदारी सोपवण्यात आली आहे.