नागपूर: एमआयडीसीतील ‘बॅण्ड बाजा बारात’ टोळीने हनी ट्रॅपमध्ये अडकवून निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताच्या मुलाकडूनही पैसे उकळले होते, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. सोनेगाव पोलिसांनाही ही टोळी ‘वॉण्टेड’ आहे.

एमआयडीसीतील हनीट्रॅप प्रकरणात अटकेतील लुटारूंना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. सुमित ऊर्फ व्यंकट परीहार (वय २१, रा. वैशालीनगर), गुन्नू बाटेश्वर मंडळ (वय २२, वैशालीनगर) व तुषार ऊर्फ मोनू अशोक जगताप (वय १९, रा. अमरनगर) ही अटकेतील लुटारूंची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांचा मुलगा एलआयसी एजन्ट आहे. दोन महिन्यांपूर्वी रियाने त्याला जाळ्यात ओढले. त्याच्याकडून हजारो रुपये उकळले. एलआयसी एजन्टने सोनेगाव पेालिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एमआयडीसीतील घटना उघडकीस आल्यानंतर याच टोळीने एलआयसी एजन्टकडूनही खंडणी उकळल्याचे समोर आले. या टोळीचे सूत्रधार अज्जू भाई ऊर्फ रजत ठाकूर व रिया ऊर्फ पल्लवी ऊर्फ प्रिया ऊर्फ श्वेता रहांगडाले दोन्ही रा. अमरनगर फरार आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. औषधोत्पादक कंपनीचे विक्री प्रतिनिधी अजय कुमार यांच्याकडून पैसे उकळल्यानंतर अज्जू हा त्याच्या कुटुंबासह फरार झाला आहे. तो वेळोवेळी मोबाइल बदलवित आहे. त्यामुळे त्याचा सुगावा लावण्यात पोलिसांना अडचण येत असल्याची माहिती आहे. एमआयडीसी पोलिसांसह सोनेगाव पोलिसही रिया व अज्जूचा शोध घेत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here