अहमदनगर : मणिपूरची घटना निंदनीय असून यातील नराधमांना फासावर लटकविले पाहिजे. या घटनेसंबंधी केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक यांनी सरकारला फटकारले आहे. मणिपूरच्या दंगलीत मे महिन्यात घडलेल्या एक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरून देशभर संताप व्यक्त होत आहे. यामध्ये महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचेही समोर आले आहे. यातील एक महिला एका माजी सैनिकाची पत्नी आहे. श्रीलंकेतील मोहीम आणि कारगिल युद्धातही या सैनिकाने महत्वाची भूमिका बजावली आहे. आपण देशाच संरक्षण करू शकलो, मात्र आपल्या पत्नीचे आणि गावकऱ्याचे नाही, अशी प्रतिक्रिया या माजी सैनिकाने व्यक्त केली आहे.स्वत: माजी सैनिक असलेले अण्णा हजारे यांना यासंबंधी माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, मणिपूरचे घटना निंदनीय आहे. आपल्या संस्कृतीत स्त्रिला मातेचा मान आहे. त्यामुळे मातेची अशी विवस्त्र धिंड काढणाऱ्या नराधमांना फासावर लटकविले पाहिजे. विशेष म्हणजे या घटनेवर केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे. यावरून कायदा व सुव्यवस्था बिघड्याचे दिसून येत आहे. आपल्या देशात महिलांवर असे अत्याचार होत असतील तर ही गोष्ट बरोबर नाही. यावर आपण केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहोत, असे अण्णा हजारे यांनी म्हटले.दिल्लीत निर्भयावर अन्याय झाला होता, तेव्हा मी एक वर्षाहून अधिक काळ मौन व्रत केले होते. यातील आरोपांना फाशीची शिक्षा द्या, अशी मी मागणी केली होती. ज्या दिवशी आरोपींना फाशीची शिक्षा झाली, त्याच दिवशी मी मौन व्रत सोडले होते. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीच दिली पाहिजे. मणिपूरच्या घटनेतील एका महिलेचे पती सैनिक होते. जो सैनिक आपल्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात आहे, त्याच्या पत्नीवर असा अन्याय होणे योग्य नाही. आमच्यातील मानवतेवर हा मोठा कलंक आहे. एक स्त्री आमची बहीण- आई आहे, तिच्यावर असा अत्याचार होणे हे गंभीर आहे, याकडे आपण नक्कीच केंद्र सरकारचे लक्ष वेधणार आहोत, असेही हजारे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here