नांदेड: शुल्लक कारणावरून झालेल्या वादात तरुणाचा हात छाटणाऱ्या आरोपींना अटक करुन त्या आरोपींची पोलिसांनी नांदेड शहरातून धिंड काढली. एक किलोमीटरपर्यंत चालवत आरोपींची धिंड काढण्यात आली. २० जुलै रोजी रात्री भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पार्किंगवरुन मारहाणीची घटना घडली होती. यावेळी आरोपींनी ३७ वर्षीय त्रिशरण थोरात या तरुणाचा तलवारीने मनगटापासून हात छाटला होता. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सुरज बसवते, आकाश रणमले, विजय जाधव या आरोपींना अटक केली.

दरम्यान, गुन्हेगारांमध्ये वचक रहावा या उद्देशाने भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी आज तिन्ही आरोपींची शहरातून धिंड काढली. भाग्यनगर पोलिस ठाणे ते जंगमवाडी आणि परत ठाण्यापर्यंत ही धिंड काढण्यात आली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे नांदेड मध्ये अशा पद्धतीने पहिल्यांदाच आरोपींची धिंड काढण्यात आली. या प्रकारामुळे नक्कीच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे याही पुढे अशाच प्रकारे कारवाई केल्यास गुन्हेगारांची हिम्मत बळवणार नाही असे नागरिकांमधून सांगितले जात आहे.

पैनगंगा नदीला पूर, विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला

जखमी तरुणाचा हात जोडण्यासाठी पोलिसांनी दाखवली माणुसकी:

दरम्यान, घटनेनंतर जखमीचा मगटापासून वेगळा झालेला हात जोडण्यासाठी पोलिसांनी माणुसकी दाखवत पुढाकार घेतला होता. सुरुवातीला जखमी तरुणाला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी छत्रपती संभाजी नगर आणि मुंबई येथील डॉक्टरांशी संवाद साधला. पण त्यांना प्रतिसाद काही मिळाला नाही. शेवटी पोलिस अधिक्षकांनी नांदेडचे अस्थि रोग तज्ञ डॉ. देवेंद्रसिंह पालीवाल यांच्याशी संवाद साधला.

त्याच रात्री डॉ. पालीवाल यांनी ८ तास शस्त्रक्रिया करून जखमी त्रिशरण थोरातचा हात जोडला आहे. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी तीन ते चार लाख रुपये खर्च येणार होता, पोलिसांनी खर्च उचलण्याची तयारी दर्शवली होती. मात्र डॉक्टरांनी पैसे घेतले नाहीत. पोलिसांची माणुसकी आणि डॉक्टरांच्या मदतीमुळे जखमी तरुणाला जीवनदान मिळाले आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
Jalna News: मत्स्योदरी देवी मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या चोरांना पोलिसांनी २४ तासांमध्ये शोधून काढलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here