अजित पवार यांनी अर्थमंत्रिपद स्वीकारुन दोनच आठवडे उलटले आहेत. त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांवर त्यांनी निधीची उधळण केली आहे. याशिवाय भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना देखील त्यांनी भरघोस निधी दिला आहे. त्याचवेळी विरोधी पक्षाच्या आमदारांना मात्र दादांनी हात आखडता घेतल्याचा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
त्यांच्यासोबत असलेल्या व विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भरघोस निधी देण्यात आला. मात्र आम्हाला काहीच निधी देण्यात आला नाही, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. काँग्रेसच्या काही निवडक आमदारांनाही निधीचं वाटप करण्यात आलं असा दावाही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
निधी न देणाऱ्या अजिदादांना यशोमती ठाकूर यांनी कडक सवाल केला आहे. विदर्भातल्या अमरावती विभागातील जनता टॅक्स भरत नाही का? आम्हाला निधी न देण्याचं कारण काय? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांना २५ कोटी
तिजोरीची चावी ताब्यात येताच अजित पवार यांनी सहकारी आमदारांना खूश करून टाकले आहे. विशेष म्हणजे बंडात साथ देणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपयांचा निधी दादांनी दिला आहे. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे भाजप आणि शिंदे गटालाही त्यांनी भरघोस निधीचे वाटप केले आहे.
दादांना अर्थ मंत्रालय द्यायला आधी विरोध केला, पण निधीचा वर्षाव केल्यावर आमदार खूश
अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास भाजप आणि शिंदे गटाने तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र, भाजप नेतृत्वाने निर्देश देताच खातेवाटप जाहीर झाले. भाजप आणि शिंदे गटाचे आमदार नाराज होणार नाहीत, याची पुरेपूर खबरदारी अजित पवार यांनी निधी वाटपच्या वेळी घेतलेली दिसून येते आहे.