मुंबई : पावसाच्या हंगामात मुंबईत सांताक्रूझ येथे एकूण २,२०५.८ मिमी पाऊस पडतो. मुंबईत यंदा २५ जूनला मान्सून दाखल झाला. त्याचवेळी यंदा मान्सूनपूर्व सरीही मुंबईत फारशा पडल्या नसल्याने सातत्याने उकाडा आणि मान्सूनपूर्व पावसाच्या सरासरीत तूट नोंदली जात होती. मात्र, गेल्या अवघ्या महिनाभराच्या काळामध्ये पडलेल्या पावसाने सांताक्रूझ केंद्रावर पावसाळी हंगामाच्या एकूण सरासरीच्या ८३ टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. १ जून ते २४ जुलैपर्यंत मुंबईमध्ये १,८४१.४ मिमी पाऊस पडला आहे. यामुळे अल्पावधीत पडणारा जोरदार पाऊस हे आत्तापर्यंतच्या पावसाचे वैशिष्ट्य या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.
मुंबईसह या जिल्ह्यांना आज हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
बिपर्जयमुळे देशभरातील पावसावर परिणाम झाला होता. परिणामी २१ जूनला संपलेल्या आठवड्यात मुंबई उपनगरांमध्ये सरासरीच्या ९५ टक्के तूट होती. त्यानंतर २८ जूनपर्यंतच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढला आणि ही तूट २१ टक्क्यांपर्यंत कमी झाली. त्यानंतरच्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजे ५ जुलैला संपलेला आठवडा आणि १२ जुलैला संपलेला आठवडा या काळात उपनगरांमध्ये अनुक्रमे १६ टक्के आणि १९ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला गेला. १९ जुलैला संपलेल्या आठवड्यात पावसाची सरासरी २४ टक्के अतिरिक्त असल्याची नोंद झाली. २० जुलैला नोंद झालेला ९९.१ मिमी पाऊस, २२ जुलै रोजी नोंद झालेला २०३.७ मिमी पाऊस आणि त्यानंतर २४ जुलै रोजी नोंद झालेला १०१.५ मिमी पाऊस यामुळे सांताक्रूझ येथे जुलैमध्ये १,२९१.८ मिमी पाऊस पडला आहे. जुलैमध्ये सांताक्रूझ येथे सरासरी पाऊस ८४०.७ मिमी पडतो. गेल्या आठवडाभरात सांताक्रूझ येथे सातत्याने मुसळधार पाऊस पडलेला नाही. १७ जुलै रोजी केवळ २६.४ तर २९ जुलै रोजी केवळ २९.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २३ जुलैलाही ४८.६ मिमी पाऊस पडला. गेल्या आठवड्याच्या आकडेवारीवरून काही दिवस पडलेला मुसळधार पाऊस आणि काही दिवस पडलेला कमी पाऊस असा असमतोल यावरून स्पष्ट होतो. जुलैमध्ये आत्तापर्यंत सांताक्रूझ येथे सर्वाधिक पाऊस १४५५ मिमी इतका पडला होता. हा पाऊस १९६६ मध्ये पडल्याची नोंद भारतीय हवामान विभागाकडे उपलब्ध आहे. जुलैची पावसाची नोंद पूर्ण होण्यासाठी अजूनही सात दिवस शिल्लक असल्याने सन १९६६ चा विक्रम यंदा मोडला जाणार का, याकडे लक्ष आहे.
Rain Forecast Maharashtra: राज्यावरील कमी दाबाचा पट्टा कायम, पाहा पावसाबाबत हवामान विभागाचा काय आहे अंदाज…
मुंबई शहरात किती पाऊस?

मुंबई शहरामध्ये कुलाबा येथील केंद्रावर १ जून ते २४ जुलै या कालावधीत १,३२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा येथे पावसाळ्यामध्ये सरासरी पाऊस २,०२१.४ मिमी इतका पडतो. २४ जुलैपर्यंतचा पाऊस हा एकूण सरासरीच्या ६५.४ टक्के आहे. १२ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये त्या आठवड्याच्या सरासरीपेक्षा ७२ टक्के पाऊस कमी होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here