राज्यसभेत संजय सिंह व काँग्रेससह विरोधी खासदार आपापल्या बाकांवरून घोषणाबाजी करीत होते. एका क्षणी संजय सिंह सभापतींसमोरील मोकळ्या जागेत पोहोचले, तोच सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना निलंबित करण्याचा इशारा दिला. त्यानंतर सिंह यांच्या निलंबनाचा ठराव मांडण्याची सूचना धनखड यांनी सरकारला केली.
‘संजय सिंह यांचे वर्तन नियमांच्या विरोधात आहे. सभापतींना विनंती करण्यात येते, की संजय सिंह यांच्यावर कारवाई करावी व त्यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजासाठी निलंबित करण्यात यावे,’ असा ठराव मांडण्यात आला. तो आवाजी मतदानाने मंजूरही झाला. कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्यावर सुमारे पाऊण तासाने संजय सिंह आप व विरोधी नेत्यांसह राज्यसभेतून बाहेर पडले व गांधी पुतळ्याजवळ गेले.
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे हेही काही वेळ त्यांच्याबरोबर होते. सिंह यांचे निलंबन मागे घ्यावे व पंतप्रधानांनी मणिपूरवर निवेदन करावे या मागण्यांसाठी विरोधी खासदार येथेच बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. दिल्ली अध्यादेशावरील प्रस्तावित विधेयकावर सर्वांत आक्रमकपणे बोलणारे सिंह यानंतर चालू अधिवेशनात सभागृहात दिसणार नाहीत, अशी चिन्हे आहेत.
आणखी किती जण रांगेत?
दरम्यान, संजय सिंह यांना निलंबित केल्यावर विरोधकांचा आक्रमक पवित्रा वरिष्ठ सभागृहात अधिक वाढण्याची शक्यता आहे. आणखी अनेक खासदारही निलंबनाच्या रांगेत असल्याचे समजते. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांना ‘तुम्ही सभापतींनाच आव्हान देत आहात,’ असा निर्वाणीचा इशारा धनखड यांनी सोमवारी कामकाजाच्या सुरुवातीलाच दिला होता.