बंडू जाधव यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आपण खासदारकीचा राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. या राजीनाम्यामागे त्यांनी राष्ट्रवादीचं स्थानिक राजकारण कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. परभणीच्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागच्यावेळी राष्ट्रवादीचं प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं होतं. जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार नसतानाही प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले होते. त्यावेळी पुढच्यावेळी आपल्याला संधी मिळेल असं सांगून आपण शिवसैनिकांना समजावलं. परंतु, आता पुन्हा जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचंच प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक राजकारणामुळे शिवसेनेची गळचेपी होत असून त्यामुळे आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा देत आहे, असं जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. राष्ट्रवादीचा आमदार नसताना त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्तेची पदं मिळतात. पण शिवसैनिकांना न्याय मिळत नाही. शिवसैनिकांना मला जर न्याय मिळवून देता येत नसेल तर माझी खासदारकी काय कामाची?, असा सवालही त्यांनी केला. बाजार समितीवर राष्ट्रवादीचं प्रशाकीय मंडळ दुसऱ्यांदा नियुक्त करण्यात आल्याचं मला शल्य आहे, त्यामुळे मी राजीनामा देत असून शिवसैनिकांना न्याय मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्यांच्या राजीनाम्यावर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तर शिवसेनेनेही जाधव यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. दुसरीकडे शिवसेनेचे काही नेते जाधव यांची समजूत काढत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर परभणी जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत समन्वय नसल्याचंही या निमित्ताने दिसून आलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times