बैरूत: लेबनॉनची राजधानी बैरूतमधील बंदरात झालेल्या स्फोटाच्या घटनेला आता दोन आठवडेही उलटून गेले आहेत. या स्फोटामुळे बंदर आणि जवळपासचा परिसर उद्धवस्त झाला. गगनचुंबी इमारती काही क्षणातच कोसळल्याचे चित्र होते. आता घटनेनंतर शहर सावरत असले तरी या स्फोटाने अनेकांच्या मनावर आघात केले आहेत.

स्फोटाच्या दोन आठवड्यानंतरही नागरिक या घटनेतून अजूनही सावरू शकलेले नाहीत. बैरूतमध्ये राहणारी सँड्रा अबिनाडार ही १८ वर्षांची तरुणी पाण्याच्या जारमधून ग्लासात पाणी घेत असताना आवाज झाला. त्यानंतर जार सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तर, काही जण अचानकपणे रात्री उठून रडत बसत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, अनेकजणांनी मानसोपचार तज्ञांकडे जाऊन उपचार घेण्याची तयारी दर्शवली नाही. मानसशास्त्रज्ञ वार्डे डाहेर यांनी सांगितले की , या घटनेचा अनेकांना धक्का बसला आहे. लहान मुलांच्या मनावर याचे खोलवर परिणाम झाले आहेत. लहान मुलांसह अनेकांना या धक्क्यातून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे.

लेबनॉनमधील नागरिकांनी अनेक वर्षांपासून गृहयुद्धाच्या झळा सहन केल्या होत्या. गृहयुद्ध संपल्यानंतरही त्यांना संघर्षाचा सामना करावा लागला आहे. करोनाचे संकट आले असताना आता भीषण स्फोटामुळे अनेकजण हादरून गेले आहेत. वाईट स्वप्ने पडणे, अचानक रडणे, चिंता, राग आणि थकव्यासारख्या मानसिक आघाताची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे मानसशास्त्रज्ञांनी लोकांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष वेधले आहे. प्रसारमाध्यमे, दूरचित्रवाणीवर सातत्याने दाखवल्यामुळे ही लोकांच्या मनावर परिणाम झाला असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

पाहा:

बैरूतमध्ये चार ऑगस्ट रोजी झालेल्या स्फोटात जवळपास १००० लहान मुले जखमी झाले असून एकूण जखमींची संख्या ही सहा हजारांहून अधिक आहे. तर, १७१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बैरूतमध्ये मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी इतर देशांनीही तातडीने आपली पथके रवाना केली होती. लेबनॉनसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला.

वाचा:

लेबनॉनमध्ये आधीपासून आर्थिक अरिष्ट सुरू झाले होते. त्यातच करोनाच्या संसर्गामुळे लेबनॉनच्या अडचणीत वाढ झाली. सरकारच्या धोरणाविरोधात लोकांमध्ये संताप होता. बैरूत बंदरात झालेल्या स्फोटानंतर लोकांच्या संतापाचा मात्र उद्रेक झाला. या भीषण स्फोटानंतर संतप्त नागरिकांनी दोन दिवस सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळणही लागले. ही घटना सरकारने केलेले अक्षम्य दुर्लक्ष आणि भ्रष्टाचारामुळे झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. सुरुवातील तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. लेबनॉनच्या पंतप्रधानांना राष्ट्रपतींची भेट घेऊन आपल्या सरकारचा राजीनामा दिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here