नागपूर: धडाडीचे सनदी अधिकारी आणि नागपूर पालिकेचे आयुक्त यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षातील त्यांची ही १५वी बदली आहे.

तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागपूरचे आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कैलास जाधव यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एस. एस. पाटील यांची सिडकोचे ज्वॉइंट एमडी, डॉ. एन. बी. गीते यांची एमएसईडीचे संचालक, अविनाश दुखणे यांची वाहतूक आयुक्त, एस. एम. चन्ने यांची एमएसआरटीसीवर, रामास्वामी यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

नवी मुंबईपाठोपाठ नागपूर पालिकेचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची कारकिर्द वादळी ठरली होती. कडक शिस्तीच्या आणि स्वभावाच्या मुंढेंनी नागपुरातील राजकारण्यांनाही न जुमानता त्यांची कार्यपद्धती सुरू ठेवल्याने त्यांच्याविरोधात राजकारण्यांमध्ये प्रचंड रोष होता. काही दिवसांपूर्वी नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओपदावरून हटवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांची बदली केली गेली असावी असं बोललं जातं. दरम्यान, गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंढे यांची बाजू घेतली होती. तरीही त्यांची बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंढे यांना करोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्विटरवरून तशी माहिती दिली होती. ‘माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोणतीही लक्षणे नसली तरी नियमानुसार मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे. मागील १४ दिवसांत जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वत:ची तपासणी करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘घरी असलो तरी मी काम करत राहणार असून नागपूरमधील करोना साथीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपण नक्कीच विजयी होऊ,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

मुंढे यांच्याकडे काम करणारा एका अटेंडन्टची करोना चाचणी रविवारी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळं संपूर्ण स्टाफची तपासणी करण्यात आली. त्यात मुंढे यांच्या ताफ्यातील एक पोलीस आणि स्वत: मुंढे यांना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं.

दरम्यान, नाशिक महापालिकेचे विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांची शासनाने पावणे दोन वर्षातच बदली केली असून नाशिक मनपाच्या आयुक्तपदी महाराष्ट्र एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानात आणि स्मार्ट सिटीच्या मूल्यांकनात नाशिकच्या चमकदार कामगिरी केली असताना आणि करोना संकटाची हाताळणी योग्य पद्धतीने केली असतानाच शासनाने कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here