‘नसरुल्लाह आणि अंजू यांचा विवाह मंगळवारी पार पडला. तिने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर धार्मिक पद्धतीने निकाह झाला,’ अशी माहिती अप्पर दिर जिल्ह्यातील मोहर्रर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी महंमद वहाब यांनी दिली. या वेळी नसरुल्लाहचे कुटुंबीय, पोलिस कर्मचारी आणि वकील उपस्थित होते. अलवर जिल्ह्यात राहणारी आणि पती, १५ वर्षीय मुलगी व सहा वर्षीय मुलगा असलेली अंजू गुरुवारी जयपूरला जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. त्यानंतर ती थेट पाकमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अप्पर दिर जिल्ह्यातील नसरुल्लाह याच्या घरी पोहोचली. एक महिन्याचा पाकिस्तानी व्हिसा व सर्व वैध कागदपत्रांनिशी पाकिस्तानात पोहोचलेल्या ३४ वर्षीय अंजूला नियमांनुसार अप्पर दिर जिल्ह्यातच वास्तव्य करावे लागणार आहे. अंजू मूळ उत्तर प्रदेशातील कैलोर गावातील असून राजस्थानातील अलवर जिल्ह्यात वास्तव्याला होती.
मालकंद विभागाचे उपनिरीक्षक नासिक मेहमूद सत्ती यांनीही हा निकाह झाल्याचे स्पष्ट केले. निकालासाठी अंजू या भारतीय महिलेने इस्लाम स्वीकारला असून, आता फातिमा ही तिची नवी ओळख आहे, असे त्यांनी नमूद केले. ‘मी माझ्या इच्छेने पाकिस्तानात आले असून, मी खूप आनंदात आहे,’ असे अंजूने न्यायालयासमोर म्हटले आहे. सोमवारी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अंजू आणि नसरुल्लाह पर्यटनासाठी गेले होते. या वेळी त्यांनी लावारी बोगदा परिसराला भेट दिली होती. येथे त्यांनी काही छायाचित्रेही काढल्याचे सांगण्यात आले.
निकाह करण्यापूर्वी अंजूने एक व्हिडिओ प्रसारित केला असून, त्यात पाकिस्तानात अत्यंत सुरक्षित वाटत असल्याचे म्हटले आहे. मी येथे कायदेशीर मार्गाने नीट नियोजन करून आले आहे. दोन दिवसांत घेतलेला हा निर्णय नाही, असेही तिने म्हटले आहे. माझे नातेवाइक आणि मुलांना माध्यमांनी त्रास देऊ नये, अशी विनंतीही तिने केली आहे.
अंजू ही कायदेशीर व्हिसाच्या आधारे वाघा-अटारी सीमेवरून पाकिस्तानात पोहोचली आहे. तिला अप्पर दिरचा ३० दिवसांचा व्हिसा देण्यात आला आहे, असे पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयातून सांगण्यात आले.
‘अंजूचे मानसिक संतुलन ढासळलेले’
अंजू मानसिकदृष्ट्या स्थिर आहे. तिचे संतुलन ढासळलेले आहे. मात्र, ती कोणत्याही प्रेमप्रकरणात गुंतलेली नाही, असा दावा तिच्या वडिलांनी केला. कुणालाही न सांगता पाकिस्तानात जाण्याची चूक तिने केली आहे, असेही ते म्हणाले.