यंदा ‘एल निनो’चे सावट असल्याने पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे महापालिकेने १८ मे पासूनच आठवड्यातून एक दिवस दर गुरुवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सुरुवात केली. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला. त्यामुळे पुण्यात आठवड्याची पाणीकपात आणखी वाढविण्याचा महापालिकेचा विचार होता. मात्र, जुलैत गेल्या आठ-दहा दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. खडकवासला साखळी प्रकल्पातील एकूण पाणीसाठा दोन दिवसांपूर्वीच ५० टक्क्यांच्या पुढे पोहोचला. त्यातच, मंगळवारी खडकवासला ९० टक्क्यांहून अधिक भरल्याने नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. तरीही, पुण्यातील पाणीकपात मागे घेण्याबाबत पुढील महिन्यात निर्णय घेऊ, असे संकेत आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले आहेत.
नदीत मंगळवारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असताना पुणेकरांना मात्र दर गुरुवारी पाण्याविना राहावे लागत आहे. दर गुरुवारी पाणी बंद ठेवल्यानंतर शहरातील अनेक भागांत पुढील दोन दिवस त्याचा परिणाम जाणवितो. पालिकेने एअर व्हॉल्व्ह बसविणे, टाक्या आधीच भरून ठेवणे, अशा उपाययोजना केल्या आहेत. मात्र, त्याचा फायदा मर्यादित स्वरूपात होत असून नागरिकांना गुरुवारपासून ते शनिवारपर्यंत पाणी कपातीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झाल्याने ही आठवड्यातील एका दिवसाची पाणीकपात तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी होत आहे.
भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
खडकवासल्यातून नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याने पाणीकपात रद्द करावी, या मागणीला राजकीय रंग मिळाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्वांनी पाणीकपात रद्द करावी, असे निवेदन आयुक्त विक्रमकुमार यांना दिले. भारतीय जनता पक्षाने मात्र याबाबत कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुणेकरांवरील पाणीकपात रद्द करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धरणातून विसर्ग सुरू
गेल्या आठवड्यापर्यंत खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणांमध्ये १० टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा होता. त्यामुळे पाण्याची चिंता वाढली होती; पण पुरेसा पाऊस होत असल्याने मंगळवारी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. सायंकाळी सातच्या सुमारास अवघ्या ४२८ क्सूसेक वेगाने पाणी सोडले जात होते; पण अवघ्या तीन तासांत रात्री दहानंतर १७१२ क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.