पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील गोरेवस्ती परिसरामध्ये सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून रवी आणि शांताबाई धोत्रे यांनी शिवीगाळ करून तरुणीला मारहाण केली. अल्पवयीन मुलाने तिच्या पोटावर मारहाण केली. यामुळे रक्तस्राव होऊ लागल्याने तरुणीला त्वरित ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिचा गर्भपात झाला. यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
सोसायटीच्या आवारातील दुचाकी पेटवली
सोसायटीच्या आवारात लावण्यात आलेली दुचाकी पेटवून देण्यात आल्याची घटना उत्तमनगर भागात घडली. याबाबत रोहित पायगुडे (वय २६, रा. संस्कार कॉलनी, कोंढवे धावडे) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पायगुडे यांनी सोमवारी रात्री घरासमोर दुचाकी लावली होती. मध्यरात्री दुचाकी ज्वलनशील पदार्थाने पेटवून देण्यात आली. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’चे चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
ट्रक लावण्याच्या वादातून मारहाण
एकाच ठिकाणी दोन ट्रक लावण्याच्या वादातून एका ट्रकचालकाने दुसऱ्याला मारहाण केल्याची घटना लोणीकंद भागात घडली. यामध्ये एका चालकाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी गुणवंत श्रीमंत कुंडकर (वय ३३, रा. लोणीकंद) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश बापूराव राठोड (वय ३२, रामनगर वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. कुंडकर हे मालकाने सांगितलेल्या जागेत ट्रक लावत होते. त्या वेळी राठोड याने अडवले आणि गुणवंत यांना धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केले.