मुंबई: हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज सकाळपासून मुंबई पावसाची संततधार सुरु आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखीनच वाढला. गेल्या काही तासांमध्ये जराही खंड न पडता पाऊस सुरु आहे. पावसासोबत वाऱ्याचाही चांगलाच जोर अनुभवायला मिळत आहे. गेल्या काही तासांमध्ये मुंबईत जवळपास १०० मिमीच्या आसपास पाऊस पडल्याचा अंदाज आहे. आगामी तीन ते चार तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या काही तासांमध्ये मुंबईतील जनजीवन ठप्प होण्याची भीती आहे.

हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील दोन दिवस मुंबईतील पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेला पाऊस सुरुच राहिल्यास गुरुवारी सकाळपर्यंत आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही तासांमधील मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगर परिसरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होताना दिसत आहे. मुंबईची लाईफलाईन असणारी रेल्वेसेवा अद्याप बऱ्यापैकी सुरळीत सुरु आहे. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्यास तिन्ही मार्गांवरील उपनगरीय रेल्वे सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.

Monsoon 2023 : कमी दाबाचं क्षेत्र कुठं तयार झालं? राज्यात पावसाचा जोर वाढणार की ओसरणार, IMD कडून अपडेट

सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत झालेला पाऊस

फोर्ट: 101.6 मिमी
हाजिअली : 79 मिमी
भायखळा: 94 मिमी
नरिमन पॉईंट: 87 मिमी
जोगेश्वरी: 90 मिमी
कांदिवली: 73 मिमी
गोरेगाव: 79 मिमी
मुलुंड : 66 मिमी
कुर्ला: 57 मिमी
मालाड: 67 मिमी
मरोळ: 90 मिमी
बांद्रा : 66 मिमी

Maharashtra Rains: साताऱ्यात अतिवृष्टी, कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात; NDRF टीम कराडमध्ये दाखल

मुंबईला रेड अलर्ट

भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे. तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

पावसामुळे विमानांची उड्डाणे विलंबाने

मुंबईत बुधवार, १९ जुलैला झालेल्या पावसाचा विमानसेवांना फटका बसला. धावपट्टीवरील दृश्यता खालावल्यामुळे अनेक उड्डाणाना विलंब झाला. दुपारी दृष्यता सर्वाधिक खालावली होती. मुंबईतील धो-धो पावसादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे सकाळपासून पाच ते दहा मिनीटे विलंबाने सुरू होती. त्यावेळी दृष्यता सातत्याने १२०० ते १८०० मीटरदरम्यान होती. परंतु दुपारी ४ वाजतादरम्यान पावसाचा जोर वाढला. त्यावेळी दृष्यता ८०० मीटरपर्यंत खालावली होती. सायंकाळी उशीरापर्यंत ही दृष्यता सातत्याने ८०० ते १हजार मीटरदरम्यानच होती. त्यामुळे अनेक उड्डाणांना सरासरी १५ ते २५ मिनीटांचा विलंब झाला. कमी दृष्यतेतही उड्डाण सुरळीत व्हावी यासाठी मुंबईच्या विमानतळावर इन्स्ट्रूमेंट लँडिंग प्रणालीची (आयएलएस) सर्वोत्तम श्रेणी बसविण्यात आली आहे. ही प्रणाली ५०० मीटरपर्यंत काम करू शकते. मात्र दृष्यता त्याहून खाली गेल्यास उड्डाणे थांबवावी लागतात. बुधवारी किमान दृष्यता ५०० मीटर होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here