मुख्यमंत्री यांना पत्र पाठवणाऱ्या ‘त्या’ तरुणाला आता महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या तरुणाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याची माहिती मिळताच महापालिकेने तातडीने हालचाली करीत त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेतले आहे. महापालिकेने रॅपिड टेस्ट केल्यानंतर या तरुणाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह देण्यात आला. मात्र, या तरुणाने जिल्हा रुग्णालयात टेस्ट केल्यानंतर त्याचा अहवाल करोना निगेटिव्ह देण्यात आला. त्यामुळे या तरुणाला मी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, असा प्रश्न पडला असून त्याने या संदर्भात एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. या पत्राच्या माध्यमातून करोना चाचणीमध्ये सुरू असलेल्या घोळावर त्याने प्रकाश टाकला होता. हे पत्र पाठवल्याची माहिती मिळताच संबंधित तरुणाला महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने हालचाली करीत करोना कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यास सांगितले. परंतु या तरुणाने जिल्हा रुग्णालयाचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगितले. अखेर तुम्ही जर कोविड सेंटरमध्ये दाखल नाही झालात, तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू, असे महापालिकेकडून सांगण्यात आल्याचा दावा या तरुणाने केला आहे. तसेच मला महापालिकेने कोविड सेंटरमध्ये दाखल केले असून जर मी निगेटिव्ह असताना मला बाधा झाली तर याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे.
मनसे झाली आक्रमक
नगरच्या युवकाने करोना पॉझिटिव्ह का निगेटिव्ह रिपोर्टच्या शंकेची व्यथा मांडल्यानंतर आता या तरुणाच्या मदतीला मनसेचे पदाधिकारीही आले आहेत. आज मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी राज्य सरकारला ई-मेल द्वारे पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी संबंधित तरुणाची व्यथा मांडतानाच नगर शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असल्याचा आरोप केला आहे. तसेच नगर मधील करोना परिस्थिती आटोक्यात आणायची असेल तर शासन नियुक्त आरोग्य अधिकारी द्या, अशी मागणीही केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times