म.टा. प्रतिनिधी, नागपूरः प्रभारी पोलिस सहआयुक्त व गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांना करोनाची लागण झाली असताना बुधवारी सहाय्यक पोलिस आयुक्तांसह ४० पोलिस अधिकारी कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पोलिस विभागात करोनाचा झपाट्याने संसर्ग होत असल्याने कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी आलेल्या पॉझिटिव्ह अहवालात सहाय्यक पोलिस आयुक्तांसह सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. आतापर्यंत ५०५ पेक्षा पोलिस अधिकारी ,कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली झाली आहे. पोलिस आयुक्तालयातील बिगुल वादकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.तसेच पोलिसाच्या एका नातेवाइकाचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे.

पोलिस दलात करोनाबाधित कर्मचाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिस आयुक्तालय व पोलिस अधीक्षक कार्यालय नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. भरणे हे पॉझिटिव्ह आल्यानंतर छावणीतील पोलिस आयुक्त कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत नागरिकांसाठी हे कार्यालय बंद असणार आहे. अत्यावश्यक असल्यास नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षातील ०७१२-२५६१२२२, २५६११०३ किंवा पोलिस आयुक्तालयातील २५९०६०१ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे. पोलिस आयुक्तालयाप्रमाणाचे सिव्हिल लाइन्समधील नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक कार्यालयही नागरिकांसाठी २ सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आले आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. पोलिसांनी घाबरुन न जाता हिमतीने करोनाचा सामना करावा. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली करोनाबाधित पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे पोलिस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप शिंदे यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here