जिल्हातील राजुरा -गोवरी मार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. काम संथ गतीने सुरु असल्याने गोवरी नाल्यावरील पुल अद्यापही अपूर्ण आहे. नागरिकांना ये -जा करण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग नाही. नाल्यावरील भराव पावसामुळे वाहून गेल्याने नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन धो-धो वाहणाऱ्या नाल्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
गोयेगाव, माथरा येथील विद्यार्थी शिक्षणासाठी राजुरा या तालुकास्थळी येतात. तालुक्याच्या ठिकाणी शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शेकडोत आहे. हे विद्यार्थी गौरी, पवनी ,कडोली येथून ये-जा करतात. मात्र, सध्या बस सेवा बंद आहे तसेच पायी जाण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. गुडघाभर चिखल आणि कंबरभर पाण्यातून विद्यार्थी मार्ग काढत शाळेत उपस्थिती लावत आहेत. शेतात उभे पिक असल्याने शेतकऱ्यांकडूनही ये-जा करण्यासाठी आडकाठी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शाळेत जाण्यासाठी आपल्या मुलांना करावा लागत असलेला जीवघेणा प्रवास बघून पालक चिंतेत आहेत. या गंभीर प्रकारकडे प्रशासनाने अद्यापही लक्ष गेलेले नाही. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.