मुंबई: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा यांना नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या जेष्ठ नेत्यांवर टीका केली आहे. काँग्रेसमधील ‘पत्र’पुढाऱ्यांचा पत्रप्रयोग म्हणजे आडगावच्या चार हौशा-गवशांनी बसविलेला ‘एकच प्याला’ या नाटकाचा रेंगाळलेला प्रयोग होता, अशा शब्दात ज्येष्ठ काँग्रेस नेत्यावर टीका करतानाच शिवसेनेने काँग्रेस नेते यांची पाठराखण केली आहे.

राज्याराज्यांचे काँग्रेसचे वतनदार स्वतःपुरते पाहतात. पक्ष त्यांच्या खिजगणतीतही नाही. पक्षात जमले नाही की भाजपमध्ये पळायचे हीच सध्या सक्रियता झाली आहे. हा नवा राजकीय कोरोना व्हायरसच म्हणावा लागेल. सोनिया गांधी, राहुल गांधी यावर काय करणार? म्हणूनच ‘पत्र पुढाऱ्यां’नी घेतलेल्या भूमिकेस व्यापक पाठिंबा मिळू शकला नाही, असं सांगतानाच काँग्रेस वर्किंग कमिटीतील वादळ व आधीचे पत्रप्रयोग म्हणजे आडगावच्या चार हौशा-गवशांनी बसविलेला ‘एकच प्याला’ या नाटकाचा रेंगाळलेला प्रयोग होता. नाटक नीट बसले नाही व पात्रांच्या मूर्खपणामुळे प्रेक्षकांनी नाटक जागेवरच बंद पाडले, पण नवा प्रयोग नव्या संचात राहुल गांधींनी लवकरच राजकीय मंचावर आणला नाही तर लोक नाटकाचे पडदे आणि प्रॉपर्टी चोरून नेतील, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून हा इशारा देण्यात आला आहे.

अग्रलेखात काय म्हटलं?
>> काँग्रेसच्या २३ प्रमुख नेत्यांच्या पत्राने निर्माण केलेले वादळ तूर्त थडांवले आहे असे दिसते. मुळात पक्षात वादळ निर्माण करण्याची क्षमता काँग्रेस पक्षातील एखाद्या नेत्यात तरी उरली आहे काय? काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी करणारे एक पत्र जुन्या काँग्रेस पुढाऱ्यांनी सोनिया गांधी यांना लिहिले. ज्यांनी हे पत्र लिहिले, त्या सर्व नेत्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यापैकी एकही नेता देश पातळीवर, राज्य पातळीवर सोडाच, पण जिल्हा पातळीवरदेखील लोकांचा नेता नाही. तरीही यापैकी अनेक नेत्यांनी काँग्रेस किंवा गांधी-नेहरू परिवाराच्या बळावर मुख्यमंत्री पदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत अनेक महत्त्वाच्या गाद्या मळल्या आहेत.

>> पी. चिदंबरम हे निष्णात वकील आहेत, पण ते नेते कधी झाले? राजीव गांधींशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली होती व तामीळनाडूत स्वतःचा पक्षही काढला होता, पण लोकांचे समर्थनच नसल्याने त्यांना हा पक्ष गुंडाळावा लागला. गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा हे जुनेजाणते नेते आहेत. शर्मा यांनी तरुणपणात काँग्रेससाठी खस्ता खाल्ल्या तशा आझाद यांनीही खाल्ल्या. कपिल सिब्बल यांनी अनेक वर्षे पक्षाची कायदेशीर बाजू भक्कमपणे सांभाळली, पण या घडीस राजकारणातील त्यांची सद्दी संपली आहे. अहमद पटेल हे उत्तम ‘मॅनेजर’ किंवा ‘सल्लागार’ आहेत, पण लोकनेते नाहीत. पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गंमत वाटते.

>> पक्षाला सक्रिय करायचे म्हणजे काय व पक्षाला सक्रिय करण्यासाठी या ‘पत्रनेत्यां’ना कोणी रोखले आहे? ७० वर्षांच्या सोनिया गांधी यांनी पक्षांतर्गत संगीत खुर्ची, खो-खो, हुतुतू, आट्यपाट्यांचे सामने भरवून सक्रियता दाखवावी असे या मंडळींना वाटते काय? दुसरे असे की, राहुल गांधी हे सक्रिय होतेच व त्यांनी एकाकीपणे मोदी-शहांना अंगावर घेतले. विधानसभा निवडणुकांत त्यांनी देश पालथा घातला. भाजपकडून त्यांच्यावर कमरेखालचे हल्ले झाले तेव्हा हे सक्रिय ‘पत्र पुढारी’ कुठे होते? राहुल गांधी यांचे खच्चीकरण मोदी-शहांच्या भाजपने केले नसेल तेवढे पक्षांतर्गत जुन्या कोंडाळय़ाने केले आहे. राहुल यांचे नेतृत्व मारायचे व कुजवायचे या राष्ट्रीय षड्यंत्रात घरभेदी सामील होतात तेव्हा पक्षाचे पानिपत नक्कीच होत असते.

>> काँग्रेसची जबाबदारी पुन्हा जर्जर प्रकृतीच्या सोनिया गांधींवर टाकून हे सर्व जुनेजाणते मोकळे झाले. एकही ‘माई का लाल’ पुढे येऊन काँग्रेसचे आपत्कालीन नेतृत्व करण्यास तयार झाला नाही.

>> सर्व जुने नेते स्वतःचे ‘स्थान’ जपण्यासाठी सक्रियता दाखवतात, प्रसंगी भाजपशी हातमिळवणी करतात, पण पक्ष म्हणून मोठी झेप घ्यावी असे त्यांना वाटत नाही.

>> देश संकटाच्या खाईत गटांगळय़ा खात असताना काही लोकांना राजकारण सुचते कसे हा प्रश्नच आहे. ‘सीबीआय’चे पथक मुंबईत येऊन विराजमान झाल्यापासून अनेकांचे आत्माराम थंडावले आहेत. त्यासंदर्भातील बातम्याही पहिल्या पानावरून आतल्या पानावर गेल्या आहेत. वृत्तवाहिन्याही थंडावल्या आहेत. एखाद्या गोष्टीचे राजकारण करायचेच म्हटल्यावर ते करणाऱयांना कोणी रोखायचे? सुशांत प्रकरणात ‘सीबीआय’ने हात घातला. त्यामुळे मीडियाचा व राजकारण करणाऱ्यांचा त्या प्रकरणातला रसच संपला. आता काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहावर बातम्यांचा बाजार गरम करण्याचे काम सुरू झाले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here