बेळगावातील ग्लोब सिनेमागृहात ‘तान्हाजी’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याला कर्नाटक नवनिर्माण सेनेने विरोध करत कनसेच्या मुठभर कार्यकर्त्यांनी सिनेमागृहावरील ‘तान्हाजी’चे पोस्टर्स उतरवले होते. त्यानंतर कनसेच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहाबाहेर घोषणाबाजीही केली. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत कनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, ग्लोब सिनेमागृहाबाहेर ‘तान्हाजी’ सिनेमाला विरोध झाल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ सिनेमागृहाबाहेर जाऊन ‘तान्हाजी’चे पोस्टर परत लावले. समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी पेढे वाटप करत फटाके फोडून जोरदार जल्लोष केला. काही दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर याने समिती नेत्यांबद्दल बेताल वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेनेने कोल्हापुरात ‘श्रीमन्ननारायण’ या कन्नड सिनेमाचं प्रदर्शन बंद पाडलं होतं. त्याचा राग मनात धरून कनसेने तान्हाजी सिनेमाला कर्नाटकात विरोध केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times