JEE Main 2020: ऐन करोना काळात देशभरात होत असलेल्या जेईई मेन आणि नीट परीक्षांवरून सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्य सरकारांचा या परीक्षा या काळात घेण्यास विरोध आहे. विद्यार्थी-पालकांचीही या परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी आहे. मात्र केंद्र सरकार या परीक्षा घेण्यावर ठाम आहे. या परीक्षांचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारीचे उपाय योजले असल्याचा दावा केला आहे.

नऊ लाख ५० हजारांवर विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेसाठी नोंदणी केली आहे तर १५ लाखांवर उमेदवार नीट परीक्षा देणार आहेत.
दरम्यान, जेईई मेननंतर बुधवारी एनटीएने नीट परीक्षेसाठीही प्रवेश पत्रे जारी केली. सायंकाळी ८ वाजेपर्यंत १५ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले होते. यापैकी ७ लाख ९० हजार नीट परीक्षा देणारे उमेदवार आहेत.

एनटीएचे संचालक विनीत जोशी यांनी सांगितले की ‘एका वेळी नोंदणी डेक्सवर जास्तीत जास्त १५ विद्यार्थीच असतील. या व्यतिरिक्त परीक्षा केंद्राच्या आत जाऊन बाहेर येण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्पर्शविहीन असेल. कागदपत्रांची तपासणीदेखील स्पर्शविहीन असेल.’

जोशी यांनी असेही सांगितले की, ‘आम्ही परीक्षेच्या आधी आणि नंतरची सर्व व्यवस्था चोख केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या वेगवेगळ्या वेळा दिल्या आहेत. एका केंद्रावर १५० विद्यार्थीच असतील. त्यांचे विविध गट बनवले आहेत आणि ते ३० ते ४० मिनिटांच्या अंतराने परीक्षा केंद्रावर पोहोचतील याची व्यवस्था केली आहे. गेटवर एक क्यू मॅनेजर असेल जो सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी करेल. स्थानिक प्रशासन, अधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. परीक्षा संपल्यावरदेखील विद्यार्थी गटागटाने बाहेर पडतील, जेणेकरून गर्दी होणार नाही.’

दरम्यान, जेईई मेनसाठी परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. आधी ५७० परीक्षा केंद्रे होती, ती आता ६६० करण्यात आली आहेत. नीटसाठी देखील परीक्षा केंद्रांची संख्या २,५४६ वरून वाढवून ३,८४३ करण्यात आली आहेत. जेईई ही संगणकीकृत परीक्षा असून नीट ही पेन-पेपर परीक्षा आहे. जेईई मेन परीक्षेला प्रति सत्र विद्यार्थी संख्या कमी करण्यात आली आहे. आधी प्रति सत्र १ लाख ३२ हजार विद्यार्थी देशभरात या परीक्षेला एका वेळी बसवण्यात येणार होते. ही संख्या आता कमी करून ८० हजारांवर आणण्यात आली आहे. परिणामी सत्रांची संख्या ८ वरून १२ पर्यंत वाढवण्यात आली आहे, असी माहितीही एनटीएने दिली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here