रायगड जिल्हा प्रशासनाडून सुट्टीबाबतची माहिती गुरुवारी रात्री उशीरा देण्यात आली आहे. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ जुलै शुक्रवारी रोजी शाळा नियमित सुरू राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही अशी माहिती रायगड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरा रत्नागिरी व संगमेश्वर उपविभागातील आठवी ते दहावी या माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
२७ जुलै रोजी गुरुवारी रत्नागिरी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच घरांचेहा नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे. तर अनेक ठिकाणी भूस्खलनाचा प्रकार घडल्याने अनेक कुटुंबांचे स्थलांतरही करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील कळवे येथे घर पडून घराचे आणि गणेश मूर्ती कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, पहाटेच्या वेळी कारखान्यात कुणीही नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली आहे. जोहे, हमरापूर विभागातील गणेश मूर्ती कारखानदारांचे खूप मोठे नुकसान होत आहे. आज पहाटे मुसळधार पावसामुळे कळवे येथील सागर पाटील यांचे घर पडून त्यांच्या अर्पित कला केंद्र या गणेश मूर्ती कारखान्याचे मोठे नुकसान झाले. सदर कारखान्यात असलेल्या माती व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असंख्य गणेश मूर्ती भिजल्या आहेत. याबाबतची माहिती पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना मिळताच, तात्काळ तलाठी सर्कल यांना घटनास्थळी पाठवून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तर मुसळधार पावसामुळे घर पडून मोठी वित्तहानी झाली असल्याने कारखानदार सागर पाटील हे चिंतेत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर संगमेश्वर येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे तर रायगड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाणी भरण्याचे प्रकार घडले आहेत. या सगळ्याचा परिणाम मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीवरही झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तूर्तास सुरळीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. मात्र, रात्री उशिरा पाणी ओसरल्याने ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.