कोण आहेत अवनी दावडा
मूळच्या मुंबईच्या अवनी यांनी प्रतिष्ठित एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बॅचलर पदवी घेऊन तिच्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर अवनीने नर्सी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी मिळवली. अवनीने २००२ मध्ये कॉर्पोरेट विश्वात पाऊल ठेवले आणि टाटा समूहात टाटा प्रशासकीय सेवेत (TAS) अर्ज केला.
टाटा कुटुंबात पाऊल ठेवत तिने उल्लेखनीय कारकीर्दीची पहिली पायरी चढली. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार त्यानंतर तिने टाटा कंपन्यांमध्ये प्रतिष्ठित TAJ लक्झरी हॉटेल्स (IHCL) आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड अशा कंपन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत व्यवस्थापनाला प्रभावित केले.
आर.के. कृष्ण कुमार यांचा विश्वास
अवनी दावडा यांनी टाटा सन्सचे डायरेक्टर आर.के. कृष्ण कुमार यांच्यासोबत जवळून काम केले ज्यांनी तिला तिच्या यशाच्या प्रवासात मोलाचे मार्गदर्शन केले. कुमार यांनी अवनीची क्षमता आणि उल्लेखनीय गुण ओळखून टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेड आणि स्टारबक्स कॉफी कंपनीतील संयुक्त उपक्रमाची देखरेख करण्यासाठी निवड केली. कृष्णा कुमार यांचे हे पाऊल ब्रँडसाठी टर्निंग पॉईंट ठरले.
अवनीने ब्रँडला लोकप्रियता मिळवून देण्याबरोबरच कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत केली. टाटा स्टारबक्सने नुकताच एक हजार कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडला असून स्टारबक्सच्या CEO म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर अवनी दावडा यांनी गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी असलेल्या गोदरेज नेचर्स बास्केट लिमिटेडमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून भूमिका स्वीकारली.