हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड, पुणे, रत्नागिरी आणि सातारा या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इतर सर्व महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट असणार असून राज्यात आज सर्वत्र धुवांधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
खरंतर, गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. पावसानं अजिबातच उघडीप न घेतल्यामुळे अनेक ठिकाणी पुराचा वेढा आहे. जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे पुढचा २४ तास देखील पाऊस असाच असणार आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घरा बाहेर पडावं आणि अतिआवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जुलैमध्ये महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं असलं तरी ऑगस्ट महिन्यात मात्र पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवड्यांत महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, १ जून ते २७ जुलै या कालावधीत सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.