वृत्तसंस्था, नवी दिल्ली : बाइक आणि मोपेडसारख्या दुचाकी वाहनांच्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने दुचाकीवरील जीएसटीचे दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत घटवल्यास हे शक्य आहे, असे मत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार दुचाकींवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करीत आहे. सीआआयशी झालेल्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही दर कमी होण्याचे संकेत दिले आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार जीएसटी कौन्सिल दुचाकींवरील करदरांचा आढावा घेण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून वाहन उद्योगाची स्थिती बिकट असून, त्यात आता करोनाची भर पडली आहे. वाहन उद्योगाने विनंती केल्यानुसार जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटीचा दर कमी करण्यावर चर्चा होईल, असे सीतारामन यांनी सीआयआयशी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. राजीव बजाज यांच्या मते वाहन उद्योग गेले वर्षभर अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. त्यामुळे जीएसटीचे दर कमी करून उद्योगाला दिलासा देण्याची आवश्यकता आहे. जीएसटीचे दर कमी झाल्यास ग्राहक आणि वाहन उद्योगालाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दुचाकी चैनीची वस्तू नाही
दुचाकी वाहनांवरील जीएसटी घटविण्याच्या प्रस्तावाचे निर्मला सीतारामन यांनी स्वागत केले असून, हा एक चांगला प्रस्ताव असल्याचे म्हटले आहे. दुचाकी चैनीच्या (लक्झरी) वस्तूंत मोडत नाहीत. सध्या दुचाकींवर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येतो. दुचाकी वाहनांची निर्मिती करणारी देशातील सर्वांत मोठी कंपनी हीरो मोटोकॉर्पनेही गेल्या वर्षी दुचाकी वाहनांच्या विक्रीवरील जीएसटी दरात घट करण्याचे आवाहन केले होते. त्याची सुरुवात १५० सीसी मोटारसायकलवरील जीएसटी १८ टक्के करून होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.


वाहन समभाग वधारले
दुचाकी ही चैनीची वस्तू नाही, तसेच ती पापवस्तूही (सिन गुड्स) नाही, असे निर्मला सीतारामन यांनी बुधवारी स्पष्ट केल्यानंतर वाहन कंपन्यांचे समभाग वधारले. टीव्हीएस मोटर कंपनीचा समभाग ६.९६ टक्के, हिरो मोटोकॉर्पचा ५.१७ टक्के तर बजाज ऑटोचा समभाग ४.२२ टक्के वधारला. त्याखालोखाल टाटा मोटर्सचा समभाग ३.८९ टक्के, आयशर मोटर्सचा ३ टक्के, महिंद्र अॅण्ड महिंद्रचा २.६० टक्के आणि अशोक लेलँडचा समभाग १.३५ टक्क्यांनी वर गेला. बीएसई ऑटो इंडेक्सही १.५१ टक्के वधारता १८,२८०.८९ वर स्थिरावला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here