मंत्र्यांचा मुलगा विद्यापीठातील शेकडो तरुणींचं लैंगिक शोषण करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकडून ५५०० व्हिडीओ क्लिप्स जप्त करण्यात आल्या आहेत. इस्लामिया विद्यापीठाचा सुरक्षा प्रमुख मेजर इजाज शाहचा यामध्ये समावेश असल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. ‘मुलाचा कारनामा उघडकीस आल्यानंतर मंत्री चीमा यांना त्यांच्या राजकारणातील संभाव्य नुकसानाबद्दल इशारा देण्यात आला होता. यानंतर चीमा यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि मुलाला वाचवण्यासाठी त्यांच्याकडे मदत मागितली,’ असं ग्लोबल व्हिलेज स्पेसनं वृत्तात म्हटलं आहे.
स्कँडलमधील मुलाचा सहभाग होऊ नये यासाठी चीमा यांनी इजाज शाहच्या अटकेची आणि व्हिडीओ-फोटो जप्त करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी इजाजला आधीच अटक केली होती. त्याच्याकडे अनेक कामोत्तेजक गोळ्या आणि औषधं सापडली. यासोबतच त्याच्याकडे अनेक विद्यार्थिनी, कर्मचाऱ्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ आढळून आले.
पोलिसांनी इजाजचा फोन तपासला. काही विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विकण्यात आल्याची माहिती त्याच्या मोबाईलमधून मिळाली. विद्यापीठात शिकत असलेल्या ११ विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलीस तपासातून उघड झाली. त्यांचा अमली पदार्थ्यांच्या तस्करीत समावेश होता. इजाजकडे इस्लामिक विद्यापीठाच्या कॅमेऱ्यांचा अवैध ऍक्सेस होता. त्या माध्यमातून तो विद्यार्थिनींवर लक्ष ठेवायचा. प्रियकराची गळाभेट घेणाऱ्या, झाडांखाली, विद्यापीठाच्या इमारतीजवळ मित्रांसोबत धूम्रपान करणाऱ्या तरुणींचे फुटेज इजाज चोरायचा आणि त्याआधारे त्यांना ब्लॅकमेल करायचा.
मी सांगतो तसं करा, अन्यथा फुटेज तुमच्या घरी दाखवेन, तुमच्या आई बाबांना पाठवेन, अशी धमकी इजाज द्यायचा. घाबरलेल्या विद्यार्थिनींना इजाज त्याच्या टोळीतील सदस्यांच्या घरी न्यायचा. तिथे त्यांचं लैंगिक शोषण केलं जायचं. या प्रकरणी पोलिसांनी विद्यापीठाचे अर्थ संचालक अबू बकर आणि परिवहन प्रभारी मोहम्मद अल्ताफ यांना अटक केली आहे. इस्लामिक विद्यापीठातील तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.