हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या २-३ दिवसांच्या पावसाच्या हालचालींमध्ये लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. यामुळे अधून-मधून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. पण मुसळधार पाऊस थोडाफार शांत होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. असं असलं तरीही राज्यातील अनेक भागांना आज ऑरेंज आणि यलो अलर्ट असणार आहे. पण उद्यापासून मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होईल.
मुंबई आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट असणार आहे. तर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला. मात्र हवामान खात्यानुसार, औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी असेल अशी शक्यता आहे.
आज कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
मुंबई आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पुढच्या २-३ दिवसांत मात्र पावसाचा जोर ओसरेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
काही महत्त्वाच्या जिल्ह्यांत पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज काय?
हवामानाच्या अंदाजानुसार, २९ जुलैपासून सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, जुलैमध्ये महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं असलं तरी ऑगस्ट महिन्यात मात्र पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवड्यांत महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, १ जून ते २७ जुलै या कालावधीत सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.