मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे सांताक्रूझ-चेंबूर, अंधेरी-घाटकोपर, जोगेश्वरी-विक्रोळी हे तीन जोडरस्ते आहेत. मात्र दोन्ही उपनगरांमधील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ लक्षात घेता गोरेगाव-मुलुंड हा चौथा जोडरस्ता बांधण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. सुमारे १२.२० किमीच्या या रस्त्यामुळे गोरेगाव ते मुलुंड हे अंतर अत्यंत कमी वेळात गाठणे शक्य होणार असून, सोबत मोठ्या प्रमाणात इंधन बचत होणार आहे. सद्यस्थितीत पूर्व द्रुतगती महामार्गापासून ते खिंडीपाडा जंक्शन (अमरनगर, मुलुंड) आणि पश्चिम द्रुतगती मार्गापासून चित्रनगरी (गोरेगाव) दरम्यान या प्रकल्पाअंतर्गत रस्त्याची विविध कामे प्रगतिपथावर आहेत. चित्रनगरी ते खिंडीपाडा जंक्शन या टप्प्यादरम्यान संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याचा भाग असल्याने, हा टप्पा (मिसिंग लिंक) जोडण्यासाठी पालिकेने सविस्तर अभ्यास केला. त्याच्या निष्कर्षानुसार हा टप्पा समांतर अशा जुळ्या आणि पूर्णपणे जमिनीखालून जाणाऱ्या अर्थात भूमिगत बोगद्यामार्फत जोडण्याचे निश्चित करण्यात आले.
प्रत्येकी तीन मार्गिका असणाऱ्या या जुळ्या बोगद्यासाठी निविदाप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. हा बोगदा बांधणे हे आव्हानात्मक स्वरूपाचे काम आहे. ही बाब लक्षात घेता, या बोगद्याच्या बांधकामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा जाहिरात प्रसिद्ध करून जागतिक स्तरावरच्या कंपन्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतील अशा रीतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते, असे पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी नमूद केले. अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी जे. कुमार-एनसीसी जेव्ही, एल ऍण्ड टी आणि ऍफकॉन्स या तीन कंपन्या अंतिम स्पर्धेत असल्याचे स्पष्ट केले. हा बोगदा पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील वन्यजीवन, जलाशय, वृक्षसंपदा यांना कोणतीही बाधा पोहोचणार नाही. प्रकल्पासाठी पर्यावरण आणि वनविभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. बोगदा उभारण्याचा कालावधी एकूण ६० महिन्यांचा म्हणजे पाच वर्षांचा अपेक्षित असून, कामाला ऑक्टोबर २०२३पासून सुरुवात केली जाणार आहे, असे वेलरासू यांनी सांगितले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
– प्रस्तावित बोगद्यांची लांबी : प्रत्येकी ४.७ किमी
– व्यास : १३ मीटर अंतर्गत व्यास
– कमाल वेग : ८० किमी प्रतितास
– गोरेगांव-मुलुंड जोडरस्त्याची एकूण लांबी अंदाजे १२.२० किमी
– जोड रस्त्याची प्रस्तावित रुंदी ४५.७० मीटर
– समांतर बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन मार्गिका
– प्रगत अग्निशमन यंत्रणा आणि अग्निरोधक यंत्रणा व सीसीटीव्ही यंत्रणा
– चित्रनगरी प्राण्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्राणीमार्गही साकारण्यात येईल
– संजय गाधी राष्ट्रीय उद्यानात कोणतेही भूसंपादन नाही