आतापर्यंत भारतामध्ये बरेच महान क्रिकेटपटू होऊन गेले. पण या सर्वांमधून एक निवडायचा झाला तर लगेच कोणालाही निवडता येणार नाही. पण भारताचे माजी महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी, भारताचा सर्वकालिन महान क्रिकेटपटू कोण? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

काही जणांना सचिन तेंडुलकर, तर काहींना विराट कोहली, तर काही जणांना महेंद्रसिंग धोनी हे सर्वकालिन महान क्रिकेटपटू वाटत असतील. पण गावस्कर यांनी आतापर्यंत बरेच क्रिकेट पाहिले आहे. त्याचबरोबर बऱ्याच महान क्रिकेटपटूंबरोबर ते खेळलेले आहेत. त्यामुळेच त्यांच्या मताला आजही वजन असल्याचे पाहायला मिळते.

गावस्कर यांनी भारताचा सर्वकालिन महान क्रिकेटपटू सांगताना, सचिन, कोहली किंवा धोनीचे नाव घेतलेले नाही. गावस्कर यांच्यामते भारताला १९८३ साली विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव हे भारताचे सर्वकालिन महान क्रिकेटपटू आहेत. आतापर्यंतच्या क्रिकेटमध्ये कपिल यांचे भरीव योगदान आहे, असे गावस्कर यांना वाटते.

याबाबत गावस्कर म्हणाले की, ” भारताने कपिल यांच्या नेतृत्वाखाली १९८३ साली पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. या विश्वचषकात परिस्थिती चांगली नसतानाही कपिल यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर विश्वविजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याचबरोबर संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी ते एक होते.”

भारताने १९८३ साली पहिल्यांदा विश्वचषक जिंकला आणि कपिल हे बऱ्याच जणांचे प्रेरणास्थान बनले होते. या विश्वचषकानंतर कपिल यांना पाहून एक पिढी क्रिकेटकडे झुकली होती. ही युवा पिढी कपिल यांना आपला आदर्श मानत होती. त्यामुळे कपिल हे त्यावेळी युवा पिढीचे हिरो होते.

इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी क्रिकेट विश्वचषक खेळवण्यात आला होता. या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत बाद झाला होता. पण उपांत्य फेरीत भारत फक्त एका चुकीमुळे पराभूत झाला, असे मत भारताचे माजी महान क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे. सुनील गावस्कर यांनी याबाबत सांगितले की, ” प्रत्येक संघात ४,५ आणि सहाव्या क्रमांकावर चांगले फलंदाज असायला हवेत. कारण जेव्हा सुरुवातीचे तीन फलंदाज लवकर बाद होतात तेव्हा या फलंदाजांवर संघाच्या धावसंख्येची मोठी जबाबदारी असते. गेल्यावर्षी झालेल्या विश्वचषकात भारताकडून अशीच एक चूक झाली. ही चूक म्हणजे भारताकडे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा चांगला फलंदाज नव्हता. जर भारताकडे चौथ्या क्रमांकावर दमदार फलंदाजी करणारा खेळाडू असला असता तर हे चित्र बदलले असते.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here