यावेळी प्रास्ताविक करत असताना अशा मदतीसाठी सरकारकडे कुठलंही ‘हेड’ नव्हतं पण अशा कामासाठी हेड नाही तर हृदयाची आवश्यकता असते. कारगिल विजयाचं स्मारक त्रिशूल युद्ध स्मारक संग्रहालयाला महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं श्रीकांत भारतीय यांनी सांगितलं.
लडाखमधल्या त्रिशूल युद्ध स्मारकाचे पुनःनिर्माण करून बारा हजार पाचशे फुटांचे भव्य युद्ध स्मारक आणि म्युझियम या ठिकाणी साकारलं जाणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा तीन कोटी रुपयांचा धनादेश लष्कराला सुपूर्त करण्यात आला. याकरता भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय गेले अनेक दिवस पाठपुरावा करत होते. भारतीय सैन्य दल हे भारतीयांच्यासाठी अभिमान बिंदू असून महाराष्ट्र शासनाला कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमी वरती सैनिक स्मारकासाठी मदत करता आली याचा अभिमान वाटत असून देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या सैन्यावरती गर्व आहे. आपण मुख्यमंत्री असताना देशासाठी लढताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना आठ लाखांची मदत आपण थेट एक कोटी रुपये केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. देश रक्षणासाठी सीमेवरती उभ्या ठाकणाऱ्या जवान अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे याचा अभिमान असल्याचे, ते म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने शहिदांना आदरांजली वाहून कारगिलचे युद्धात त्यावेळी प्रत्यक्ष सहभागी असलेले लेफ्टनंट जनरल एच.के. कहकोन यांचे व कारगिल वीरांचे आभार मानले. अशा पद्धतीने उभ्या राहणाऱ्या स्मारकाला महाराष्ट्राकडून मदत करता येते आहे, याबद्दल लष्कराचे आभार मानले. तसेच याकरिता पाठपुराव्या करणाऱ्या विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचेही कौतुक केले. महाराष्ट्र सरकार अशा कुठल्याही बाबतीत कायम भारतीय लष्कराच्या सोबत आहे महाराष्ट्राच्या गौरवशाली लष्करी परंपरेचा आणि भारतीय लष्कराचा आम्हाला अभिमान आहे. देशासाठी झुंजणाऱ्या प्रत्येक सैनिका सोबत आम्ही आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
लेफ्टनंट जनरल एच.के. कहकोन यांनी महाराष्ट्र शासनाने भारतीय लष्करासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. देशभरातील पर्यटक लडाखला पर्यटनासाठी येतील तेव्हा कारगिलसह सर्वच युद्धात भारतीय सैन्य दलाने केलेला पराक्रमाची गाथा या ठिकाणी पाहायला मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि निवेदन आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले. आभार निवृत्त मेजर गायकवाड यांनी मानले. यावेळी मंत्री अनिल पाटील, दादाजी भुसे भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण विविध खात्यांचे सचिव सभागृहात उपस्थित होते.