म. टा. प्रतिनिधी, पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी शहरातील अनेक रस्ते बराच वेळ बंद ठेवण्यात आले. तसेच मध्यभागातील दुकाने व इतर सर्व व्यवहार पोलिसांनी सक्तीने बंद करण्यास भाग पाडल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला. रस्ते, दुकाने आणि सर्व व्यवहार सकाळपासून बंद ठेवल्याने करोनाकाळातील टाळेबंदी आणि संचारबंदीचा अनुभव नागरिकांना आला. वैद्यकीय तसेच इतर अत्यावश्यक सेवेसाठी इच्छितस्थळी जाताना नागरिकांना पर्यायी रस्ते शोधण्याची कसरत करावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यापूर्वीच्या पुणे दौऱ्यात एवढी सक्ती कधीही करण्यात आली नव्हती.

फुटीनंतर काका-पुतण्या पहिल्यांदाच एका मंचावर, शरद पवारांनी नाव घेताच अजितदादांनी कान टवकारले

मोदी यांच्या पुणे दौऱ्यावेळी रस्ते टप्प्याटप्प्याने बंद केले जातील; तसेच दुकाने व इतर व्यवहार सुरळीत सुरू राहतील, असे पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. तरीही मोदी यांच्या दौऱ्यावेळी मंगळवारी शहरातील अनेक रस्ते बराच वेळ बंद ठेवले होते. मध्यभागातील दुकानांसह सर्व व्यवहार सक्तीने बंद ठेवले होते. मोदी यांच्या दौऱ्यावेळी शहरातील शाळा, महाविद्यालये, सर्व आस्थापना, दुकाने, कार्यालये, सरकारी कार्यालये, कंपन्या यांचे कामकाज सुरू राहील, असे पोलिसांनी सोमवारी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही स्थानिक पोलिसांनी शिवाजीनगर, डेक्कन, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता), टिळक रस्ता, शिवाजी रस्ता या भागातील अंतर्गत रस्ते; तसेच दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडले. मोदी यांचे सकाळी आगमन झाल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला प्रस्थान करेपर्यंत या भागात संचारबंदीसारखे वातावरण होते. दुपारपर्यंत शहराच्या अनेक भागांतील दुकाने उघडली नव्हती. नागरिकांना आवश्यक वस्तू आणि औषधांची खरेदी; तसेच रुग्णालयात जाताना कसरत करावी लागली.

पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार, शरद पवारांच्या अख्ख्या भाषणात फक्त एका ओळीत अभिनंदन, नेमकं काय बोलले?

बांबूने रस्ते बंद का केले?

मोदी यांच्या दौऱ्यावेळी शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहर पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी असा पाच हजार पोलिसांचा फौजफाटा; तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन तुकड्या आणि ‘फोर्स वन’ची पथके बंदोबस्तास होती. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ‘एसपीजी’च्या पथकांकडे होती. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन कॉलेज रस्ता), टिळक रस्ता अशा काही रस्त्यांवर पोलिसांनी बांबूचे कुंपण लावल्याने नागरिकांच्या वावरण्यावर मर्यादा आल्या होत्या. पदपथावरून चालणेही अवघड झाले होते. गणपती विसर्जन मिरवणूक आणि पालखी सोहळ्यावेळी असतात, त्याप्रमाणे बांबूने रस्ते बंद करण्याचे प्रयोजन काय, असा सवाल नागरिक विचारत होते.

पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात अन् टाळ्यांचा कडकडाट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here