MCX वर आज सोने-चांदीचा भाव
बुधवारी देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंवर दबावासह व्यवहार होताना दिसला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे MCX वर सोन्याचे ऑक्टोबर फ्युचर्स (वायदे) १.१२% किंवा ६७१ रुपयांनी ५९ हजार ४११ रुपये प्रति १० ग्रॅमवर घसरले होते जे आदल्या दिवशी ५९ हजार ३५० आणि ५९ हजार ९३० रुपयांच्या दरम्यान व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे चांदीचे सप्टेंबर वायदे १.९३% किंवा १४५७ रुपये घसरून घसरून ७३ हजार ९७० रुपये प्रति किलोवर आले आहेत.
दुसरीकडे, सराफा बाजारात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ६० हजार ४०० रुपये आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ५५ हजार ४०० रुपये आहे. याउलट, चांदीची किंमत ७८ हजार प्रति किलो इतकी वाढली आहे. देशभर सोन्याच्या किमती सामान्यत: जागतिक आर्थिक परिस्थिती, चलनवाढीचा दर, चलनातील चढउतार आणि स्थानिक मागणी व पुरवठा गतीशीलतेसह विविध घटकांद्वारे ठरवल्या जातात.
सोन्यावर हॉलमार्कचे महत्त्व
सराफा बाजारात सोन्याचे दागिने खरेदी करताना आपण खरेदी करणाऱ्या पिवळ्या धातूची शुद्धता तपासणे आवश्यक असते. भारतीय मानके संस्थेद्वारे (BIS) शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क दिले जाते. २४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर ९९९, २३ कॅरेटवर ९५८, २२ कॅरेटवर ९१६ तर १८ कॅरेटवर ७५० अंकीत असते. लक्षात घ्या की अनेक ठिकाणी ग्राहकांद्वारे २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याची आग्रहाने खरेदी केली जाते. २४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध असले तरी त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. तर २२ कॅरेट सोने जवळपास ९१ टक्के शुद्ध असून त्यात ९% इतर धातू असतात आणि त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होतो.