मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा जुगतावत कुटुंबीयांना माहिती मिळाली की त्यांचा मुलगा डॉ. सागर जुगतावत हा टुरिझ्म सिटी फुकेट येथील समुद्र किनाऱ्यावर बुडून त्याचा मृत्यू झाला. ही बातमी समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली.
दरम्यान, सागरसोबत त्याचा मित्र हर्षित वर्मा याचाही मृत्यू झाल्याचं कळालं आहे. मृत सागरसोबत त्याचा भाऊ मयूर जुगतावत आणि सुमारे ७ मित्रही थायलंडला गेले होते. सागर आणि हर्षितसोबत ही दुर्घटना झाली. त्यावेळी अथर्व आणि रुबल राठोड हे मित्रही समुद्रकिनारी पाण्यात खेळत करत होते. यादरम्यान, समुद्रात जोरदार लाटा उसळू लागल्या होत्या, त्यामुळे चौघेही बुडू लागले. या दोघांशिवाय रुबलही लाटांमध्ये अडकला, पण कसातरी तो पोहत समुद्र किनारी आला.
फुकेटच्या समुद्रात या दोघांना बुडताना पाहून एकच गोंधळ उडाला. लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण लाटा इतक्या जोरदार होत्या की त्यांना वाचवता आलं नाही. याची माहिती तटरक्षक दलाला देण्यात आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानंतर तटरक्षक दलाने दोघांचेही मृतदेह बाहेर काढून त्यांची तपासणी केली. तपास आणि ओळखीनंतर तटरक्षक दलाने फुकेट प्रशासनाला माहिती दिली.
प्रशासनाने दोघांचेही मृतदेह फुकेट रुग्णालयात ठेवले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती भारतीय दूतावासापर्यंत पोहोचली. थायलंडमध्ये कागदोपत्री कारवाई केल्यानंतर डॉ. सागर आणि त्याच्या मित्राचे मृतदेह भारतात आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. याठिकाणी दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी केली आहे. घरात तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.