म. टा. प्रतिनिधी, सांगली: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपल्याने बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी गुरुवारी प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारला. बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ मिळावी यासाठी सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम () आणि आमदार विक्रम सावंत प्रयत्नशील होते. मात्र, पालकमंत्री जयंत पाटील () यांनी अखेर प्रशासकाची नियुक्ती करून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेससह विद्यमान संचालकांना दणका दिला.

सांगली बाजार समितीची २०१५ मध्ये निवडणूक झाली होती. स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार विक्रम सावंत यांच्या पॅनेलविरोधात पालकमंत्री जयंत पाटील, माजी आमदार विलासराव जगताप आणि स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पॅनेलमध्ये लढत झाली होती. डॉ. कदम यांच्या आघाडीने सतरापैकी चौदा जागांवर बाजी मारली होती. विरोधी पॅनेलला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र अडीच वर्षापूर्वी बाजार समितीमधील राजकीय समीकरणे बदलली. त्यानंतर विरोधी गटाचे संचालक दिनकर पाटील यांची सभापतीपदी वर्णी लागली. बाजार समितीत डॉ. कदम, सावंत गटाची सत्ता असली तरी, विरोधी गटाचे सभापती होते. संचालक मंडळाची २६ ऑगष्ट रोजी पाच वर्षांची मुदत संपली. महाराष्ट्र कृषी उत्पन्न अधिनियम १९६३ मधील कलम १४ (३)(अ) च्या तरतुदीनुसार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका २४ जुलै २०२० पासून सहा महिने कालावधीसाठी पुढे ढकलल्या आहेत. परंतु, बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासक येणार की संचालकांना मुदतवाढ मिळणार याबाबत जिल्ह्यात उत्सुकता होती.

बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास मुदतवाढ मिळवण्यासाठी सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आणि आमदार सावंत यांचे
प्रयत्न सुरू होते. पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना करोना झाल्याने त्यांचा पदभार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. मंत्री पाटील यांनी तातडीने प्रशासक नियुक्तीच्या हालचाली सुरू केल्याने सहकार राज्यमंत्री डॉ. कदम यांनी बुधवारी रात्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सहभागी असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊनच प्रशासक नियुक्तीचा निर्णय व्हावा, अशी विनंती केली होती. मात्र, पालकमंत्री पाटील यांनी प्रशासक नियुक्तीचा निर्णय कायम ठेवला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा शासन आदेश गुरुवारी दुपारी जिल्हा सहकार विभागाला मिळाला. या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक करे यांची प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. करे यांनी प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रशासक नियुक्ती मधून पालकमंत्री पाटील यांनी बाजार समितीमधील पराभवाचे उट्टे काढत काँग्रेसला शह दिल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here