नागपूरः करोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला व २१ मार्चपासून एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. नेहमी गजबज राहणाऱ्या एसटी बस स्थानकावर शुकशुकाट दिसू लागला. मधल्या काळात फक्त श्रमिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात अली होती.

नियमित प्रवाशांसाठी सेवा नव्हती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने जिल्ह्यातल्या जिल्ह्यात एसटी वाहतुकीला परवानगी दिली. मात्र नागपूर करोनाच्या रेड झोनमध्ये असल्याने नागपुरातून गाडी बाहेर जाण्यास व नागपुरात येण्यास बंदी होती. बाकी नागपूर जिल्ह्यात गाड्या सुरू होत्या. आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र यात लांब पल्ल्याच्या गाड्या बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे जी गावे २०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहेत तेथे गाड्या जाणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. मात्र प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे नागपूरच्या गणेशपेठ आगारातून पुण्यासाठी एसटी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी स्लिपर कोच नसून आसनी (सीटर) आहे. दररोज सायंकाळी ५ वाजता ही गाडी नागपूरवरून सुटते व पुणे येथे सकाळी ९ च्या सुमारास पोहते. त्याचप्रमाणे पुणे येथून सायंकाळी ५ ला निघून सकाळी ९ वाजता नागपूरला परत येते.

सध्याला पुण्याला जायचे असल्यास एक तर खासगी वाहनाने जावे लागते किंवा मग विमानाने. विशेष रेल्वे गाड्या सुरू असल्या तरी रेल्वेने राज्यांतर्गत प्रवास करता येत नाही. त्यामुळे नागपूरवरून रेल्वेने पुण्याला जाता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर एसटीने पुणे गाडी सुरू करून प्रवाशांना मोठाच दिलासा दिला आहे. या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असल्याचे गणेशपेठ आगार प्रमुख अनिल आमनेरकर यांनी मटाला सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here