नगरच्या महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता आहे. भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर आहेत. मनपाच्या राजकारणात आतापर्यंत शिवसेना विरोधाची भूमिका करीत असे. अनेक मुद्द्यांवर शिवसेनेने आंदोलने करून सत्ताधारी पक्ष आणि मनपा प्रशासनाला धारेवर धरले आहे. आता मात्र भाजपनेच आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आरोग्य विभागाच्या कारभाराचे तत्कालीन कारण यासाठी घडले आहे. महपालिकेच्या रुग्णालयात मनपाची रक्तपेढीही आहे. मात्र, ती बऱ्याच काळापासून बंद आहे. ती सुरू करण्यासंबंधी जी पूर्तता करणे आवश्यक आहे, त्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पडून आहे. महापौरांनी अनेकदा पाठपुरावा केला, तरीही आयुक्तांकडून हालचाली होत नसल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक गंधे यांनी केला आहे. या कारणासाठीच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ही परिस्थिती ओढावण्यास मनपाचे आरोग्य अधिकारी आणि आरोग्य विभागासह राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनालाही त्यांनी जबाबदार धरले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असूनही भाजपनेच महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याविरोधात पुकारलेले आंदोलन चर्चेचा विषय बनला आहे. महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मनपाची रक्तपेढी बंद असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. महापौरांनी अनेकदा आदेश देऊनही याची पूर्तता होत नसल्याने आंदोलनाची वेळ आल्याचे भाजपने म्हटले आहे.
यापूर्वीही भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांशी मतभेद झालेले आहेत. जिल्हाधिकारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी दुजाभाव करीत असल्याचा आरोप एका आंदोलनाच्यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला होता. पुन्हा लॉकडाउन घोषित करण्याच्या मागणीवरूनही भाजपच्या लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना टार्गेट केले होते. अधिकारी ऐकत नसतील तर राजीनामा देण्याचा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला होता. आता मनपा आयुक्तांच्याविरोधात शहरातील पदाधिकारी मैदानात उतरले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times