सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नितीन देसाई यांनी लालबाग राजाच्या मंडपाच्या सजावटीचे काम सुरु केले होते. लालबागच्या राजाच्या ९० व्या वर्षीच्या मंडप पूजन आणि सजावटीचा श्री गणेशा आज संपन्न झाला, अशी पोस्टही नितीन देसाई यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. मात्र, हे काम पुर्णत्त्वाला जाण्यापूर्वीच नितीन देसाई यांच्या आयुष्याची अखेर झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार,नितीन देसाई यांनी पहाटे आत्महत्या करण्यापूर्वी ११ ऑडिओ क्लीप रेकॉर्ड केल्या होत्या. या ऑडिओ क्लीप्स त्यांनी परिवारातील सदस्य, मित्र आणि वकिलांना पाठवल्याची माहिती समोर आली आहे. आपण ज्या कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्यांच्याकडून फसवणूक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप नितीन देसाई यांनी केला. तसेच कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, यासाठी नितीन देसाई यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचेही समजते. नितीन देसाई यांच्या सूचनेनुसार त्यांचे सहायक योगेश ठाकूर यांनी संबंधित ऑडिओ क्लीप अॅडव्होकेट वृंदा विचारे यांना पाठवल्याचे समजते. दरम्यान, नितीन देसाई यांच्यावर एन.डी. स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काही नातेवाईक परदेशात असल्यामुळे नितीन देसाई यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार केले जातील. त्यामुळे नितीन देसाई यांचा मृतदेह जे.जे. रुग्णालयातच ठेवण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.
आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केल्या व्हॉईस क्लीप, चार बिझनेसमनची नावं?
नितीन देसाई मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीहून मुंबईत परतले होते. यानंतर ते पहाटे अडीचच्या सुमारास एन.डी. स्टुडिओमध्ये पोहोचले. तेव्हाच ते तिथल्या मॅनेजरशी बोलले. तुला उद्या सकाळी मी व्हॉईस रेकॉर्डर देतो असं त्यांनी सांगितलं होतं. हा व्हॉईस रेकॉर्डर त्यांच्या मृतदेहाच्या बाजूलाच होता. पोलिसांनी तो ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. त्यामध्ये काही व्हॉईस नोट असून चार व्यावसायिकांनी आपल्याला कसं छळलं, आर्थिक व्यवहारानंतर कसा दबाव आणला, हे ध्वनिमुद्रित केल्याची माहिती आहे.