पुणे: ज्येष्ठ साहित्यिक आणि निसर्गकवी या बिरुदावलीने गौरविले गेलेल्या ना. धों. महानोर यांचं गुरुवारी पुण्यात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ना. धों. महानोर यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरु होते. या शेवटच्या दिवसांमध्ये ना. धों. महानोर यांनी सतत मला शेतावर घेऊन चला, असा हट्ट धरला होता. ना. धों. महानोर यांची कन्या सरला शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी त्यांना अनेकदा, ‘उठा… डोळे उघडा… चला, असे म्हणायचे. तेव्हा ते पाय हलवून प्रतिसाद द्यायचे. परवा त्यांनी मला दोन्ही हातांनी लोटून दिले. तोंडामध्ये नळ्या असल्यामुळे ते बोलू शकले नाहीत. पण त्यांचं एकच म्हणणं होतं की, मला शेतावर घेऊ चल, मला घरी घेऊन चल. पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना उचलून घेऊन जाऊ शकत नव्हतो. ते व्हेंटिलेटरवर होते, गेल्या आठ-दहा दिवसांपासून सतत डायलिसिस सुरु होते. पण त्यांचा सगळा जीव शेतात होता, असे सरला शिंदे यांनी सांगितले.

यावेळी सरला शिंदे यांनी ना.धों. महानोर यांची आणखी एक भावूक आठवण सांगितली. मी त्यांना ‘एक होता विदुषक’ चित्रपटातील ‘ मी गाताना गीत तुला लडिवाळा…’ हे गाणं ऐकवायची. तेवढं गाणं ऐकलं की रडायचे ते, असे सरला शिंदे यांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं. कवी ना धों महानोर यांनी त्यांच्या कवितेने मराठी कवितेवर आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली आहे.ही नुसतीच निसर्गकविता नाही तर ही पर्यावरणवादी कविता आहे.ते नुसते गाणेही नाही तर पर्यावरणीय प्रबोधन घडवण्याचे तसेच गीतातील, कवितेतील जानपद लोकलय जपण्याचेही मोठे कार्य महानोरांच्या कवितेसह त्यांच्या एकूणच कार्याने केले आहे. कादंबरी लेखन, लोककथांचे,लोकगीतांचे संपादन, समकालीन कवितांचे प्रातिनिधिक संपादन,विपुल मराठी चित्रपट गीत लेखन, इतर गद्यलेखनही त्यांनी भरपूर केले आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळ्यांवरचे अनेक पुरस्कार, मानसन्मान त्यांना लाभले आहेत.

निसर्गकवी ना.धों. महानोर कालवश, पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास

विधान परिषदेवर ज्या अपवादात्मक नियुक्त्या प्रतिभावंतांच्या झाल्या त्यात दोनदा विधान परिषदेवर ते नियुक्त केले गेले होते. तिथेही त्यांनी त्यांची छाप उमटवली आहे. आम्ही विदर्भ साहित्य संघाच्या वतीने घेतलेल्या पहिल्या व शेवटच्या अनियतकालिक विकास परिषदेसाठी महानोर आले होते.त्या परिषदेच्या शिफारशी त्यांनी विधान परिषदेत लावून धरल्या होत्या.परिणामी त्यावर शासनाने दोनदा समित्याही नेमल्या.‘पद्मश्री’ प्राप्त महानोर साहित्य अकादमीच्या पुरस्काराचेही मानकरी आहेत.‘जनस्थान पुरस्कार’ही त्यांना मिळाला आहे. ‘मराठवाडा साहित्य संमेलन’, ‘जलसाहित्य संमेलन’, ‘औदुंबर साहित्य संमेलन’ अशा अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. मात्र मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अशा संस्थांचे अध्यक्ष राहूनही व ‘जागतिक मराठी अकादमी’, ‘साहित्य अकादमी’, ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’, ‘चित्रपट महामंडळ’, ‘विश्वकोश निर्मिती मंडळ’ अशा साहित्य संस्थात्मक कार्याचे नेतृत्व करूनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मात्र त्यांनी कधीच स्वीकारले नाही. एकूणच मराठी साहित्य प्रांताला सतत जाणवत राहील अशी उणीव त्यांच्या जाण्याने आपल्या वाट्याला आली आहे. अनेकांप्रमाणेच माझेही त्यांचे व्यक्तिगत मैत्र व परस्पर आदराचे संबंध राहिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here