या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी विष्णू जोशी (वय २० वर्ष, रा. आयोध्या नगर, बजाज नगर, ज्योतिर्लिंग हाऊस, वडगाव, कोल्हाटी) असे गळफास घेतलेल्या तरुणीचं नाव आहे. तेजस्विनीचे वडील कंपनीत काम करतात तर आई घरी खाजगी शिकवणीचे क्लास घेते. तिला एक भाऊ आहे.
तेजस्विनी ही शांत स्वभावाची होती. चांगल्या क्षेत्रात करिअर करायचे असल्यामुळे तिने बारावीनंतर नीटची परीक्षा दिली. मात्र त्या परीक्षेत तिला कमी मार्क मिळाले. यामुळे तिने यावर्षी पुन्हा नीटच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती.
दरम्यान बुधवारी तिचे वडील कंपनीत कामासाठी गेले होते, तर आई घरीच होती. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तेजस्विनीने तुळशीला दिवा लावला, आई शिकवण्याचे क्लास घेत होती, यावेळी ती रूममध्ये गेली. काही वेळाने आईने तिला आवाज दिला मात्र तिचा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून बघितला असता तेजस्विनीने ओढणीच्या साह्याने गळफास घेतला होता.
तिला तात्काळ खाली उतरवत घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तेजस्विनीने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार अशोक जाधव करीत आहे.