माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावी परीक्षेत निकालाचे प्रमाण अत्यंत कमी असलेल्या शाळांची शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून तपासणी केली जात आहे. या टप्प्यात पंधरा शाळांची तपासणी करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांच्या तपासणीसाठी उपसंचालक कार्यालयाचे पथक नुकतेच जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे पोहचले. येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक आश्रमशाळेला भेट देणार होते. पथकाने शाळेच्या पत्त्यावर शाळा शोधण्याचा प्रयत्न केला. परिसरात संबंधित शाळेबाबत विचारणा केली; मात्र संबंधित ठिकाणी शाळा असल्याचे आढळले नाही. उपसंचालक कार्यालय पथकाने संबंधित ठिकाणचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. संबंधित शाळेचा शोध घेण्याचे, पंचनामा करण्याचे निर्देश दिले. विस्तार अधिकारी दत्ता शिरसागर, केंद्रप्रमुख जी. यू. शिरसाठ, गट समन्वयक बी. झुंबड, विशेष शिक्षक साईमंदी कुंटावार, ए. व्ही. पोथरे आदींनी भेट दिली. परंतु प्रत्यक्ष ठिकाणी शाळेची इमारत, विद्यार्थी आढळले नसून पथकाने भेटीचा अहवाल दिल्याचे सहायक संचालक रविंद्र वाणी यांनी सांगितले. यानंतर पथकाने जालन्यातील डग्लस गर्ल्स हायस्कूलला भेट दिली. येथे विद्यार्थी नियमित नसल्याचे पथकाला आढळून आल्याचे सांगण्यात आले.
यूडायएसच नाही
पथकाच्या तपासणीबाबात शिरसागर यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी शाळा पाहण्यासाठी आम्ही गेलो परंतु तेथे काही इमारत आढळली नाही. विद्यार्थीही नाहीत. यासह शाळेचा युनिफाइड डिस्टिक्ट इन्फॉरर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन (यूडायएस) क्रमांक ही नाही. संबंधित ठिकाणी शाळाच नसल्याचे समोर आले. यूडायएस क्रमांक शाळांना आवश्यक असतो. प्रत्येक शाळेला त्यावर नोंदणी बंधनकारक असते. या शाळेकडे यूडायएस क्रमांक नाही, शाळा संबंधित ठिकाणी अस्तित्वात नाही तर शाळेचे विद्यार्थी दहावीला कसे बसतात, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शाळेला मंडळ मान्यता कोणत्या आधारे देण्यात आली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
संबंधित शाळा बंद असल्याचे तपासणीत आढळले. शाळा बंद असली तरी संबंधित शाळेतून दहावीला विद्यार्थी परीक्षेला बसतात. याबाबत आता शिक्षण मंडळाकडे विचारणा, तपासणी केली जाईल. त्यांची मंडळ मान्यता, शिफारस याबाबत पडताळणी केली जाईल. शाळा समाजकल्याण विभागाची आहे. त्यामुळे संबंधित विभागालाही पुढील कार्यवाहीबाबत कळविण्यात येईल.
– अनिल साबळे,
शिक्षण उपसंचालक