राज्यात प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मृत्यूंबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य विलास पोतनीस यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. याबाबत लेखी उत्तरात दिलेली माहिती धक्कादायक आहे. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांमध्ये अनुक्रमे १८६, २३५, २६०, २०१, ३२४ आणि १६१ महिलांचे प्रसूतीदरम्यान मृत्यू झाले आहेत. मागील काही वर्षांत प्रगत औषधोपचार, तंत्रज्ञानाचा वेग वाढल्यानंतर प्रसूतीप्रसंगी होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात असे परिणाम होत नसल्याचे समोर आले आहे. कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळेच हे मृत्यू होत आहेत का, असा प्रश्न पोतनीस यांनी विचारला होता.
या प्रश्नावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी लेखी उत्तर दिले. ‘ग्रामीण, आदिवासी भागात शासनाकडून संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे घरी होणाऱ्या प्रसूतींचे प्रमाण कमी झाले आहे. अॅनेमिया, रक्त कमी असलेल्या गर्भवतींच्या याद्या बनवून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लोहयुक्त गोळ्या देण्यात येतात. रक्तक्षय असलेल्या महिलांना आवश्यक आयर्न सुक्रोज इंजेक्शन देण्यात येते. गरोदर स्त्रियांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास संबंधित महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी आशा कार्यकर्तींना एक हजार रुपये देण्यात येतात.
माता मृत्यू टाळण्यासाठी जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, मातृत्व अनुदान योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबवण्यात येते’, अशी माहिती सावंत यांनी दिली. अॅनेमियामुक्त भारत योजना, संस्थात्म प्रसूतीसाठी प्रोत्साहन, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, लक्ष्य कार्यक्रम, सुरक्षित मातृत्व आश्वासन, तज्ज्ञांकडून नियमित तपासण्या, चाचण्या, मोफत सोनोग्राफी आदी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सरकारकडून लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.
मृत्यूची कारणे…
घरी होणारी प्रसूती
अॅनेमिया
रक्त कमी असणे
अतिरक्तस्राव
प्रसूतीनंतरचा संसर्ग
रुग्णवाहिकेअभावी आरोग्य केंद्रात पोहोचण्यास उशीर
अपुऱ्या दिवसांची प्रसूती
उच्च रक्तदाब