मुंबईः करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा रद्द करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, आज अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द न करता त्या होणारच असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. यावरून भाजम आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला घेरलं आहे.

कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरुंना विश्वासात घेतलं नाही, शिक्षण तज्ज्ञांची मते धुडकावली. युजीसीला जुमानले नाही. मंत्री मंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले. अंहकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले? असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. तर, एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला, असा खोचक टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार. ऐकतो कोण? सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला. महाराष्ट्रातील ‘पाडून दाखवा सरकारने’ स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले आहे., अशी उपरोधिक टीका शेलार यांनी केली आहे. तर विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका. परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊ या. यश तुमच्या वाट्याला नक्की येईल. तुमचे भविष्य उज्वलच आहे, असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, पदवी परीक्षांसंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा होणार. ज्या राज्यांना वाटत आहे की त्यांना परीक्षा घेणे शक्य नाही, त्या राज्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे जावे. परंतु राज्य अंतिम सत्र परीक्षा घेतल्याशिवाय पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करू शकत नाहीत, असा निकाल देत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.

वाचाः

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here